सिंधुदुर्ग : कंझ्युमर्स वॉटर मिटर वरुन पुन्हा एकदा सभेत खडाजंगी, सत्ताधारी विरोधक आमने सामने, कणकवली नगरपंचायत विशेष सभा पुन्हा गाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 04:25 PM2018-01-08T16:25:41+5:302018-01-08T16:31:33+5:30

कणकवली नगरपंचायतीच्यावतीने नागरिकाना उपलब्ध करून देण्यात आलेल्या नळ जोडणीवर बसविण्यात येणाऱ्या कंझ्युमर्स वॉटर मिटरवरुन नगरपंचायतीची विशेष सभा पुन्हा एकदा गाजली.

Sindhudurg: Against Consumers Water Miter once again, Khadajangi, ruling opponent face to face, Kankavli Nagar Panchayat special meeting again | सिंधुदुर्ग : कंझ्युमर्स वॉटर मिटर वरुन पुन्हा एकदा सभेत खडाजंगी, सत्ताधारी विरोधक आमने सामने, कणकवली नगरपंचायत विशेष सभा पुन्हा गाजली

सिंधुदुर्ग : कंझ्युमर्स वॉटर मिटर वरुन पुन्हा एकदा सभेत खडाजंगी, सत्ताधारी विरोधक आमने सामने, कणकवली नगरपंचायत विशेष सभा पुन्हा गाजली

googlenewsNext
ठळक मुद्देकणकवली नगरपंचायत विशेष सभा पुन्हा गाजली कंझ्युमर्स वॉटर मिटर वरुन पुन्हा एकदा सभेत खडाजंगी सत्ताधारी विरोधक आमने सामने,

कणकवली : नगरपंचायतीच्यावतीने नागरिकाना उपलब्ध करून देण्यात आलेल्या नळ जोडणीवर बसविण्यात येणाऱ्या कंझ्युमर्स वॉटर मिटरवरुन नगरपंचायतीची विशेष सभा पुन्हा एकदा गाजली.

यापूर्वी या वॉटर मीटर खरेदी वरुन सत्ताधाऱ्यांवर केलेले आरोप विरोधी नगरसेवकांनी पुन्हा केले.तसेच नागरिकांना हे वॉटर मीटर मोफत पुरविण्यात यावेत. अशी जोरदार मागणी नारायण राणे समर्थक समीर नलावडे तसेच अन्य नगरसेवकांनी केली.

तर या मुद्याविषयी स्पष्टीकरण देताना मुख्याधिकारी अवधूत तावड़े यांनी वॉटर मिटर पुरविण्याची कमी दराची निविदा तेव्हा कोणी का भरली नाही? असा प्रश्न उपस्थित केला.वॉटर मिटरच्या या मुद्यावरून सत्ताधारी तसेच विरोधी नगरसेवकात मागील सभे प्रमाणेच सभागृहात काहीवेळ जोरदार खडाजंगी उडाली.

कणकवली नगरपंचायतीची विशेष सभा सोमवारी प.पू. भालचंद्र महाराज सभागृहात नगराध्यक्षा माधुरी गायकवाड़ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, मुख्याधिकारी अवधूत तावड़े उपस्थित होते.

या सभेत प्रामुख्याने कंझ्युमर्स वॉटर मिटरचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. या मीटरच्या किमत नागरिकांकडून वसूल करण्यास समीर नलावडे यांनी विरोध दर्शविला. त्याला अभिजीत मुसळे, किशोर राणे, बंडू हर्णे आदी नगरसेवकांनी अनुमोदन दिले. तसेच उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर हे स्वतः त्या मिटरची किंमत नगरपंचायतीला अदा करणार का?असा प्रश्न बंडू हर्णे यांनी उपस्थित केला.

त्यामुळे या विषयावरुन सभागृहात जोरदार खडाजंगी उडाली. नागरिकांकडून या मिटरचे पैसे घ्यायचे असतील तर एवढे महागड़े मीटर कशाला पाहिजेत? चांगल्या दर्जाचे मीटर अगदी 500 ते 600 रुपयात मिळतात. जीएसटी मुळे आता 900 रूपये किंमत झाली आहे.ते का घेतले नाहीत? अशी विचारणा समीर नलावडे यांनी केली.

शेवटी वॉटर मीटरची किंमत कोणाकडून वसूल करायची याबाबतचा निर्णय न घेताच अजेंडयावरील पुढील विषय घेण्यात आला. त्यामुळे एवढी चर्चा करून काय निष्पन्न झाले ? तुम्ही वेळ फुकट घालवत आहात.असे रूपेश नार्वेकर म्हणाले. त्यामुळे विरोधी नगरसेवक संतप्त झाले.

सत्तेत असताना साडेसात वर्षात तुम्ही काहीच केले नाही. असे रूपेश नार्वेकर यांनी म्हटल्यानंतर त्यातील अडीच वर्षे तुम्ही आमच्याबरोबर सत्तेत होता. मग तुम्हीही का काही केले नाही.असे बंडू हर्णे यांनी विचारले.

या विषयावर पडदा टाकण्यासाठी कन्हैया पारकर यांनी नार्वेकर यांना शांत रहायला सांगितले. तसेच विरोधक 'बेसलेस' चर्चा करीत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे समीर नलावडे यांनी संतप्त होत, ' फक्त तुम्ही शहाणे आणि आम्ही खुळे आहोत का? असा प्रश्न पारकर यांना विचारला . यावरून सभागृहात एकच खसखस पिकली.

नगरपंचायतीच्यावतीने ओला कचरा,सुका कचरा, घातक कचरा जमा करण्यासाठी तिन वेगवेगळे डस्टबिन शहरात वाटण्यात आले आहेत. मात्र, हा कचरा उचलण्याबाबत नगरपंचायत प्रशासनाने व्यवस्थित नियोजन केलेले नाही. त्यामुळे महिलांच्या तक्रारी आमच्याकडे येत असल्याचे समीर नलावडे यांनी सांगितले .

अभिजीत मुसळे, किशोर राणे यांनीही याबाबत प्रश्न विचारत काही सूचना केल्या. तर मुख्याधिकारी, नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षानी कचऱ्याबाबतचे योग्य नियोजन केले असल्याचे सांगितले.

स्वच्छता अभियान राबविताना फक्त छायाचित्र काढून घेण्यासाठी नगरसेवकाना बोलावु नका असे मुख्याधिकाऱ्याना समीर नलावडे यानी याविषयावरुन बोलताना सांगितले. यावरुनही जोरदार चर्चा झाली.

नागरी सहाय्य योजनेंतर्गत 2 कोटि 25 लाख रुपयांचा निधी नगरपंचायतीला मिळणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सभागृहात सांगितले. तसेच 1 कोटि 5 लाख रुपयांच्या प्रस्तावाना मंजूरी मिळाली असून अजुन निधी वर्ग झालेला नाही .असे ते म्हणाले. या निधीतून विकास कामे करण्याबाबत चर्चा यावेळी झाली.

मसुरकर किनई रस्ता तसेच तेथील गटार याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. नगरसेवक सुशांत नाईक यांनी या चर्चेत भाग घेतला. मोबाईल टॉयलेटची सुविधा कातकरी समाजाला तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.अशी मागणी समीर नलावडे, बंडू हर्णे आदी नगरसेवकांनी केली. सार्वजनिक उत्सवांच्या वेळी हे टॉयलेट विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावेत. अशी मागणीही त्यांनी केली.

मोबाइल टॉयलेटसाठी खाजगी कार्यक्रमाच्यावेळी संबधिताकडून शहरात 1000 रूपये, शहराबाहेर 2000 रूपये भाड़े व 5000 रूपये अनामत रक्कम आकारण्याचे यावेळी ठरविण्यात आले. यावेळी विविध निविदांविषयी चर्चा करून निर्णय घेण्यात आला. या विशेष सभेच्या वेळी नगरसेविका मेघा गांगण, स्नेहा नाईक, नगरसेवक अण्णा कोदे अनुपस्थित होते.

मच्छी मार्केटचा विषय पुन्हा चर्चेत !

नगरपंचायतीच्या श्री पटकीदेवी मन्दिर येथील मच्छी मार्केट मध्ये चिकन , मटण विक्रेत्यांना बसविण्या बाबत यावेळी चर्चा करण्यात आली. मत्स्योद्योग महामंडळाने घातलेल्या जाचक अटी मुळे विक्रेत्यांना तीथे बसविता येत नाही. संबधित जागा नगरपंचायतीची असून 70 लाख रूपयेही नगरपंचायतीने खर्च केले आहेत. त्यामुळे या महामंडळाने दिलेला 99 लाख रुपयांचा निधी नगरपंचायत फंडातून त्याना परत करण्यात यावा.

मत्स्य विक्रेत्यांची सोय त्यांनी करावी असे पत्र त्याना देण्यात यावे. त्यांनतर संबधित मार्केटचा वापर नगरपंचायतीला कुठल्याही बंधनाशिवाय करता येईल. त्यासाठी सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन निर्णय घ्या.असे बंडू हर्णे यांनी सुचविले. तर या मार्केट मध्ये मटण, चिकन विक्रेत्यांना बसवा. त्यानंतर मग काय होईल ते बघता येईल . असे इतर नगरसेवकांनी सुचविले.
 

Web Title: Sindhudurg: Against Consumers Water Miter once again, Khadajangi, ruling opponent face to face, Kankavli Nagar Panchayat special meeting again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.