सिंधुदुर्ग : सावंतवाडीतील अत्याचार प्रकरण : पोलीस चेतन गुप्ताचे आश्रयदाते शोधणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 03:16 PM2018-07-31T15:16:36+5:302018-07-31T15:20:29+5:30
लग्नाचे आमिष दाखवून सावंतवाडीतील प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या मुलाने परिसरातीलच एका मुलीवर गेली दोन वर्षे अत्याचार केले होते. याबाबतचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी चेतन अशोक गुप्ता याला तब्बल सतरा दिवसांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सावंतवाडी : लग्नाचे आमिष दाखवून सावंतवाडीतील प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या मुलाने परिसरातीलच एका मुलीवर गेली दोन वर्षे अत्याचार केले होते. याबाबतचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी चेतन अशोक गुप्ता याला तब्बल सतरा दिवसांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
येथील न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. चेतन गुप्ता हा सतरा दिवस कोणाच्या आश्रयाला होता, त्या आश्रयदात्याचा पोलीस शोध घेणार आहेत.
संशयित आरोपी चेतन गुप्ता याची पीडित मुलीशी २०१५ मध्ये फेसबुकवरून ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेत गुप्ता याने मी तुझ्याशी लग्न करतो, असे तिला सांगून तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले होते. यानंतर तो त्या मुलीला सावंतवाडीतील आपल्या फ्लॅटवर तसेच शिरोडा वेळागर येथील समुद्रकिनारी घेऊन जाऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता.
हा प्रकार गेली दोन वर्षे सुरू होता. पीडित मुलीला चेतन याचे लग्न झाल्याची माहिती मिळताच तिने त्याच्याशी प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या संशयित आरोपी चेतन याने याची वाच्यता तू कुठे बाहेर केलीस तर तुला सोडणार नाही. तुला व तुझ्या वडिलांना संपवून टाकेन, अशी धमकी दिली होती. एवढेच नाही तर आरोपीने अलीकडेच आपल्यासोबतचे फोटो पीडितेच्या भावाला पाठविले होते. त्यामुळे हा सर्व प्रकार उजेडात आला होता.
आरोपी चेतन गुप्ता याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस आरोपीने गुन्ह्यात वापरलेली कार तसेच मुलीवर कुठे कुठे नेऊन अत्याचार केले याचा शोध घेणार आहेत. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीने कोणाकोणाकडे आश्रय घेतला याचाही पोलीस शोध घेणार आहेत. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लक्ष्मण गवस करीत आहेत.
आरोपीच्या आई, बहिणीला न्यायालयाकडून जामीन मंजूर
पीडित मुलीने पोलिसांकडे चेतन गुप्ताच्या विरोधात अत्याचाराची, तर त्याच्या आई व बहिणीविरोधात मारहाणीची तक्रार दिली होती. यात आरोपी चेतन याच्या आई व बहिणीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
तर मुख्य आरोपीने या प्रकरणात जामीन मिळावा यासाठी जिल्हा न्यायालय तसेच उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. पण उच्च न्यायालयाने आरोपीला जिल्हा न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आरोपी सोमवारी न्यायालयासमोर हजर झाला होता.