सिंधुदुर्ग : मालवाहू ट्रक २०० फूट दरीत, आंबोली घाटातील घटना : ट्रकचालकाचा दुर्दैवी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 02:28 PM2018-08-09T14:28:22+5:302018-08-09T14:33:37+5:30
आंबोली घाटात धोकादायक वळणावर कठडा तोडून मालवाहतूक ट्रक सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळला. हा अपघात बुधवारी सायंकाळी पावणेसहाच्या दरम्याने घडला. मुख्य धबधब्यापासून सावंतवाडीच्या दिशेने समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.
आंबोली : आंबोली घाटात धोकादायक वळणावर कठडा तोडून मालवाहतूक ट्रक सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळला. हा अपघात बुधवारी सायंकाळी पावणेसहाच्या दरम्याने घडला. मुख्य धबधब्यापासून सावंतवाडीच्या दिशेने समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.
ट्रकचालकाला बचाव पथकाने रात्री ८.३० वाजता दरीतून बाहेर काढत आरोग्यकेंद्रात हलविले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तो मृत असल्याचे जाहीर केले. त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची कागदपत्रे न आढळल्याने त्याचे नाव किंवा पत्ता समजू शकला नाही.
आंबोली घाटात वर्षा पर्यटनाचा हंगाम सुरू असताना बुधवारी सायंकाळी ट्रक दरीत कोसळल्याने पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे. घाटात रस्त्यावर पडलेले खड्डे, तुटलेले संरक्षक कठडे व अन्य सुरक्षिततेच्या बाबतीत घाट रस्ता धोकादायक असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
अपघातात दोनशे फूट खाली कोसळलेला ट्रक सावंतवाडीहून कोल्हापूरमार्गे पुणे येथे जात होता. यावेळी मुख्य धबधब्यापासून खाली दोनशे मीटर अंतरावर धोकादायक वळणावर दरीच्या बाजूने असलेले चार संरक्षक कठडे तोडून हा ट्रक खाली कोसळला. या अपघातात ट्रकचे अक्षरश: तुकडे झाले.
अलीकडेच पावसाळ्यापूर्वी खासगी मोबाईल कंपनीने कठड्याच्या बाजूने केलेल्या खोदकामामुळे कठडे कमकुवत झाले आहेत. त्यामुळे ट्रकची धडक बसताच कठडे तुटल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तर धोकादायक वळणावरील भलामोठा खड्डा चुकविण्याच्या नादात समोरून येणाऱ्या वाहनामुळे ट्रकचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
आपत्कालीन पथकाची दमदार कामगिरी
रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ट्रक कोसळलेल्या ठिकाणी पोहोचण्यास आंबोली आपत्कालीन पथकाला यश आले. यावेळी ट्रकचा चालक केबीनखाली अडकलेला दिसून आला. त्याला पथकातील तरूणांनी दरीतून बाहेर काढले. मात्र तो या अपघातातून वाचू शकला नाही. पथकामध्ये उत्तम नार्वेकर, अनिल नार्वेकर, अमरेश गावडे, दीपक मेस्त्री, संतोष पालेकर, राजू राऊळ, राकेश अमृसकर आदींनी सहभाग घेतला. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.
दोरखंडाच्या सहाय्याने दरीत उतरले
अपघात झाल्याचे समजताच आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वास सावंत, गजानन देसाई आदींनी घटनास्थळी धाव घेतली. तर आंबोली आपत्कालीन टिमही घटनास्थळी दाखल झाली.
काळोख पडल्याने अपघातग्रस्त ट्रकपर्यंत पोहोचणे कठीण होते. तरीही बचाव पथकातील काहींनी काळोख, धुके, सोसाट्याचा वारा आणि पाऊस अंगावर झेलत बॅटऱ्यांच्या उजेडात दोरखंडाच्या साहय्याने दरीत उभारण्याचा धाडसी निर्णय घेतला.