सिंधुदुर्ग : ठिबक सिंचन योजनेच्या कर्ज व्याजदरात घट : सतीश सावंत , जिल्ह्यातील ऊस क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 11:47 AM2018-01-05T11:47:05+5:302018-01-05T11:52:19+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र वाढविण्यासाठी आणि पाण्याची बचत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि डी. वाय. पाटील साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ठिबक सिंचन योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या कर्जाच्या व्याज दरात २.५० टक्क्यांची घट करण्यात आली आहे. तसेच या कर्ज योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याला कारखान्याकडून ७ हजार ५०० रुपयांचे अनुदान दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र वाढविण्यासाठी आणि पाण्याची बचत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि डी. वाय. पाटील साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ठिबक सिंचन योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या कर्जाच्या व्याज दरात २.५० टक्क्यांची घट करण्यात आली आहे. तसेच या कर्ज योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याला कारखान्याकडून ७ हजार ५०० रुपयांचे अनुदान दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत सतीश सावंत बोलत होते. यावेळी डी.वाय. पाटील कारखान्याचे शेती अधिकारी पी. जी. पाटील, सुपरवायझर भागोजी शेळके आदी उपस्थित होते.
यावेळी सतीश सावंत म्हणाले की, जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढावे यासाठी ठिबक सिंचन योजना फायदेशीर ठरत आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि डी.वाय. पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने ठिबक सिंचन कर्ज योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेचा लाभ घेतल्यास उसाचे पिक वाढण्यास आणि पाण्याची बचत होण्यास आणि मनुष्य बळ वाढन्यासही मदत होणार आहे. त्यामुळे या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी यावेळी केले आहे.
कारखान्याकडून शेतकऱ्यांना अनुदान
या योजनेंतर्गत शेतकऱ्याला हेक्टरी ३० हजार रुपयांचे कर्ज देण्यात येते. तसेच यासाठी कारखान्याकडून शेतकऱ्याला ७ हजार ५०० रुपयांचे अनुदान दिले जाते. यासाठी बँक, कारखाना आणि शेतकरी यांचा त्रिपक्षीय करार होणे आवश्यक आहे. हा करार करणाऱ्या शेतकऱ्याला हेक्टरी ३० हजार रुपयांचे कर्ज ११ टक्के व्याज दराने दिले जात होते. मात्र, आता या व्याज दरात २.५० टक्के एवढी कपात करण्यात आली आहे.