सिंधुदुर्ग : गोव्यातील तीन पर्ससीन नौका जेरबंद, मालवणच्या मच्छिमारांची चाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 06:57 PM2018-02-14T18:57:54+5:302018-02-14T19:02:55+5:30
मच्छिमारांनी मालवण समुद्रात सोमवारी मध्यरात्री तीन एलईडी मासेमारी करणाऱ्या गोवा राज्यातील तीन पर्ससीन नौकांना जेरबंद केले. मत्स्य विभागाला याबाबत कल्पना देऊनही टाळाटाळ केल्याने मच्छिमारांनी तीन नौका पकडून शासनाच्या डोळ्यात अंजन घातले आहे.
मालवण : प्रखर प्रकाशझोतातील मासेमारीवर केंद्र सरकारने बंदी घातली असताना परराज्यातील पर्ससीन व हायस्पीड नौकांकडून सिंधुदुर्ग किनारपट्टीवर खुलेआम मासळीची लूट सुरु आहे. याबाबत स्थानिक मच्छिमारांनी आमदारांच्या साथीने समुद्रातच आर या पारचा एल्गार पुकारल्यानंतर मच्छिमारांनी मालवण समुद्रात सोमवारी मध्यरात्री तीन एलईडी मासेमारी करणाऱ्या गोवा राज्यातील तीन पर्ससीन नौकांना जेरबंद केले. मत्स्य विभागाला याबाबत कल्पना देऊनही टाळाटाळ केल्याने मच्छिमारांनी तीन नौका पकडून शासनाच्या डोळ्यात अंजन घातले आहे.
राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात परराज्यातील नौका मासेमारी करण्यास बंदी आहे. तसेच केंद्र सरकारने एलईडी मासेमारीला बंदी आणली आहे. त्यातच पर्ससीन मासेमारीचा बंदी कालावधी सुरू आहे, अशी सरकारची कडक धोरणे असतानाही अनधिकृत मासेमारी रोखण्यात शासन अपयशी ठरले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग किनारपट्टीवर बळावणारा पर्ससीन, हायस्पीडचा अतिरेकीपणा मच्छिमारांमध्ये संघर्ष भडकण्याची शक्यता आहे.
मालवण किनारपट्टीवर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील समुद्रात प्रखर प्रकाशझोतातील मासेमारी करत असल्याचे सोमवारी मध्यरात्री मच्छिमारांना दिसून आले. प्रकाशझोतातील मासेमारी पुढे हतबल झालेल्या मच्छिमारांनी समुद्रात नौका पकडण्याच्या इराद्याने सुमारे १५० मच्छिमारांच्या आर्मीने बेकायदा मासेमारी करत असलेल्या नौकांच्या दिशेने चाल केली.
बघता बघता तीन पर्ससीन नौकांना घेरत हल्लाबोल केला. भर समुद्रात दोन हात करणाऱ्या मच्छिमारांनी मंगळवारी पहाटे तीनही नौका मालवण किनारी आणल्या. यानंतर मच्छिमारांच्या पराक्रमाचे कौतुक होत असताना पकडलेल्या नौकांवर कारवाईची अपेक्षा आहे.
मालवणच्या समुद्रात बेकायदेशीरपणे मासेमारी करताना पकडण्यात आलेल्या तीनही नौकांवर एलईडी लाईट आणि पर्ससीनची जाळी होती. गोवा येथील पॅट्रिक डिसिल्वा यांची लिना (आयएनडी जीए ०१ एमएम १४५) आणि एसटी मिचेल (आयएनडी जीए ०१ एमएम १०४) या दोन बोटी तसेच संतोष मडगावकर यांची श्री दामोदर १ (आयएनडी जीए ०१ एमएम ४५२) या बोटी किनाºयावर आणण्यात आल्या.
लिना या बोटीवर खलाशी केशव लोबो यांच्यासह २९ खलाशी होती. तर दामोदर या बोटीवर ३० खलाशी तर एसटी मिचेलवर ४ खलाशी होते. यातील श्री दामोदर १ या बोटीवर किरकोळ मासे आढळून आले. मच्छिमारांनी तीनही नौका किनारी आणल्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
संघर्ष भडकण्याची शक्यता
महाराष्ट्र राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात परराज्यातील नौकांना मासेमारी करण्यास बंदी आहे. तसेच केंद्र सरकारने एलईडी मासेमारीला बंदी आणली आहे. त्यातच पर्ससीन मासेमारीचा बंदी कालावधी आहे, अशी सरकारची कडक धोरणे असतानाही अनधिकृत मासेमारी रोखण्यात शासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग किनारपट्टीवर बळावणारा पर्ससीन, हायस्पीडचा अतिरेकीपणा यामुळे मच्छिमारांमध्ये संघर्ष भडकण्याची शक्यता आहे.
दिव्यांची क्षमता २ हजार व्हॅट
आमदार वैभव नाईक यांनी त्या नौकांची पाहणी करत खलाशांकडून माहिती घेतली असता एका एलईडी दिव्याची क्षमता २ हजार व्हॅट इतकी असल्याचे सांगण्यात आले. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, मच्छिमार नेते रविकिरण तोरसकर, छोटू सावजी, दिलीप घारे यांनी भेट देत मच्छिमारांची कैफियत जाणून घेतली. यावेळी पोलीस प्रशासनाचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक अमोल साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, आशिष भाबल, रुपेश सारंग, विल्सन डिसोझा, मंगेश माने, आशिष कदम, रमेश तावडे यांनी माहिती घेतली.
आमदार नाईकांकडून नौकांची पाहणी
मच्छिमारांनी पकडलेल्या गोवा राज्यातील तीन पर्ससीन नौकांची आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी दुपारी पाहणी केली. यावेळी स्थानिक मच्छिमारांनी मांडलेल्या कैफियती त्यांनी जाणून घेतल्या. यावेळी नाईक यांनी मत्स्य विभागाच्या मुख्य आयुक्तांशी संपर्क साधून ह्यत्याह्ण नौकांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देताना त्या नौका जप्त करून जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात येतील, असे स्पष्ट केले. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, नगरसेवक पंकज साधये, संन्मेश परब, तपस्वी मयेकर, बाबी जोगी आदी उपस्थित होते.
प्रकाशझोत मासेमारी
समुद्रात २० वावाच्या बाहेर मासेमारी करत असताना प्रखर लाईट असलेला एक साधा व एक पर्ससीन ट्रॉलर वापरला जातो. यात साध्या ट्रॉलरवर मोठा जनरेटर सेट बसविण्यात येतो. संपूर्ण ट्रॉलरवर प्रखर दिव्यांची रोषणाई केली जाते. या रोषणाईच्या आकर्षणाने मासळीचे थवेच्या थवे लाईटच्या दिशेने ओढले जातात.
अर्धा ते पाऊण तास प्रखर लाईट सुरू ठेवल्यानंतर सुमारे वीस किमी परिसरातील मासळी त्या ट्रॉलरच्या परिघात सामावली जाते. त्यानंतर लाईट बंद केली जाते आणि त्याचवेळी ट्रॉलरजवळ आकर्षित झालेली मासळी पर्ससीन जाळ्यांच्या सहाय्याने ट्रॉलरमधून पकडली जाते. या मासेमारीमुळे लहान-लहान मासळी तसेच मत्स्य बीज नष्ट होत आहे.