सिंधुदुर्ग : पावसाळ्यात महामार्ग होणार धोकादायक, अपघात होण्याची दाट शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 04:45 PM2018-05-21T16:45:22+5:302018-05-21T16:45:22+5:30
महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामाचा फटका पावसाळ्यात वाहतुकीला बसण्याची शक्यता आहे. या कामासाठी महामार्गाच्या दुतर्फा असलेली माती मोठ्या प्रमाणात खणली आहे.
कणकवली : महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामाचा फटका पावसाळ्यात वाहतुकीला बसण्याची शक्यता आहे. या कामासाठी महामार्गाच्या दुतर्फा असलेली माती मोठ्या प्रमाणात खणली आहे. सिंधुदुर्गात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिखलमिश्रित पाणी रस्त्यावर येऊन वाहनांचा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी आतापासूनच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
महामार्गाचे चौपदरीकरण काम सध्या जोरदार सुरू आहे. सिंधुदुर्गातील खारेपाटण ते झाराप दरम्यान हे काम करण्यात येत आहे. महामार्गाच्या रुंदीकरणासाठी अनेक ठिकाणी दोन्ही बाजूंची झाडे तोडण्यात आली आहेत. तसेच मातीही खणण्यात आली आहे. २०१९ पर्यंत ७० टक्के काम करण्याचे आदेश कंत्राटदारांना असल्याने ते जोरदार कामाला लागले आहेत. पोकलेनच्या मदतीने रस्त्याच्या शेजारील टेकड्यांची माती काढली जात आहे.
काही ठिकाणी महामार्गाच्या शेजारील भाग खोदून ठेवले आहेत. हे करताना पाणी जाण्यासाठी आवश्यक मार्ग ठेवण्यात आलेले नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असतो. या मुसळधार पावसात टेकड्या तसेच उंच भागातील पाणी वाहून रस्त्यावर येत असते.
सध्या महामार्गाचे काम सुरू असल्याने चिखलाचे पाणी थेट रस्त्यावर येणार आहे. तसेच तो चिखल रस्त्यावर साचून राहण्याची भीती आहे. यासाठी पुढील पंधरा दिवसांत पाणी वाहून जाण्यासाठी उपाययोजना करावी लागणार आहे.
पाणी वाहून जाण्यासाठी उपाययोजना न केल्यास ते चिखलमिश्रित पाणी महामार्गावर येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागणार आहे. विशेषत: दुचाकी चालकांना तर मोठा त्रास होणार असून अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
या अपघातात जीवितहानी होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या शक्यतांचा विचार करून प्रशासनाने पावसाळी नियोजन करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच महामार्गाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारांना त्वरित सूचना देणे आवश्यक आहे.
आता मे महिना संपत आला असून कोणत्याही क्षणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. साधारणत: चार महिने जोरदार पडणाऱ्या पावसात मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.