सिंधुदुर्ग : कृषि सहाय्यक पदाच्या भरतीत घोळ : परशुराम उपरकर यांची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 12:14 PM2018-05-03T12:14:45+5:302018-05-03T12:14:45+5:30

कृषि सहाय्यक पदाच्या भरतीबाबत परिपूर्ण माहिती मागवीली असून अन्याय झालेल्या कोकणातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न मनसे करणार असल्याची माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.

Sindhudurg: Information of Parashuram Upkar | सिंधुदुर्ग : कृषि सहाय्यक पदाच्या भरतीत घोळ : परशुराम उपरकर यांची माहिती 

सिंधुदुर्ग : कृषि सहाय्यक पदाच्या भरतीत घोळ : परशुराम उपरकर यांची माहिती 

Next
ठळक मुद्देकृषि सहाय्यक पदाच्या भरतीत घोळ : परशुराम उपरकर यांची माहिती  अन्यायग्रस्त तरुणांना न्याय मिळवून देण्याचा मनसेचा प्रयत्न 

कणकवली : नांदेड येथे पोलिस भरतीत घोळ झाल्याचे नुकतेच उघड झाले आहे. तसाच घोळ कृषि विभागाकडून घेण्यात आलेल्या कृषि सहाय्यक पदाच्या परिक्षेमध्ये झाल्याचा संशय कृषि पदविका तसेच पदवीधर विद्यार्थ्यानी माझ्याजवळ व्यक्त केला आहे. त्यामुळे या भरतीबाबत परिपूर्ण माहिती मागवीली असून अन्याय झालेल्या कोकणातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न मनसे करणार असल्याची माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.

कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते. यावेळी  उपरकर म्हणाले, कृषि पदविका तसेच पदविधारक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेऊन त्यांच्यावर झालेल्या अन्याया बाबत निवेदन दिले आहे. कोकण विभागातील 210 कृषी सहाय्यकांची पदे भरण्यासाठी कृषि विभागाकडून ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेत चुकीचे प्रश्न होते.

निकालाच्यावेळी विद्यार्थ्यांना या चुकीच्या प्रश्नांचे वाढीव गुण देताना कोकणातील विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यात आला आहे. कोकणातील विद्यार्थ्यांना या कृषिसहाय्यक पदाच्या भरतीत डावलण्यात आले असून सिंधुदूर्गातील फक्त 4 पदे भरली आहेत. एकूण पदांच्या फक्त 2 टक्के इतकी ही संख्या आहे.

विद्यार्थ्यांना त्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका पहाण्यासाठी ऑनलाईन अथवा कोणतीही सोय उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे अलीकडेच झालेल्या नांदेड येथील पोलिस भरतीतील घोळा प्रमाणेच या परीक्षेतही घोळ झाल्याचे संबधित विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

कृषि विभागातील बाहेरच्या जिल्ह्यातील अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संगनमत करून या भरतीत गोलमाल केल्याची शक्यता आहे. त्यामुळे या भरतीची शासनाने सखोल चौकशी करावी आणि भ्रष्टाचार उघड करावा.अशी मागणी मनसेच्यावतीने आपण शासनाकडे केली आहे.

तसेच वेळप्रसंगी न्यायालयीन लढाहि या समस्येच्या निराकरणासाठी देण्याची तयारी आपण केली असून अन्याय झालेल्या कृषि पदविका तसेच पदविधारक विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे रहाणार असल्याचे परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. पदविधारक विद्यार्थी नोकरीची वाट पहात असताना त्यांची अनेक माध्यमातून उपेक्षा होत आहे. अशावेळी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यानी बोगस भरतीसारखी कामे करण्यापेक्षा येथील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही.

जिल्ह्यात डीएड, बीएड झालेले अनेक विद्यार्थी बेरोजगार आहेत. विविध क्षेत्रातील पदविधारकही बेरोजगार असून त्यांचे नोकरीसाठी आवश्यक असलेले वय निघुन जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला तोंड देण्यासाठी त्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. मनसे त्यांच्या लढ्याला सर्व शक्तीनिशी पाठिंबा देईल.असेही परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले.

शासकीय भरती विभागनिहाय करा !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सद्यःस्थिती पहाता अनेक पदविधारक विद्यार्थ्यांची नोकरीसाठी आवश्यक वयोमर्यादा निघुन गेली आहे. अनेक प्रकल्पग्रस्ताना अजूनही नोकरी मिळालेली नाही. शिक्षण विभाग, आरोग्य विभाग यासारख्या विविध विभागात कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या तरुणांना अजूनही न्याय मिळू शकलेला नाही.

तिलारी धरण ग्रस्तांवर अन्याय झाला असून त्यांच्या तिसऱ्या पिढीला आता नुकसान भरपाई मिळत आहे. यापूर्वीच्या त्यांच्या दोन पिढ्यावर नोकरी तसेच मोबदल्या अभावी अन्यायच झाला आहे. नोकर भरतीच्यावेळी कोकणावर सातत्याने अन्याय होत आहे. त्यामुळे येथील तरुण बेरोजगार आहेत. ही बेरोजगारी कमी करायची असेल तर शासकीय भरती विभागनिहाय करावी. म्हणजे इतर भागातील तरुण या भरतीत सहभागी होऊ शकणार नाहीत. त्यामुळे कोकणातील तरुणांनाच रोजगार मिळेल. असेही यावेळी परशुराम उपरकर म्हणाले.

 

Web Title: Sindhudurg: Information of Parashuram Upkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.