सिंधुदुर्ग : लोकराज्य विशेषांक पोलिसांसाठी प्रेरणादायी, प्रकाश गायकवाड : सायबर गुन्हे, सुरक्षिततेबाबत मोलाची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 01:54 PM2018-01-18T13:54:56+5:302018-01-18T14:00:50+5:30
माहिती व जनसंपर्क विभागामार्फत प्रकाशित होणारा जानेवारी महिन्याचा लोकराज्यचा अंक पोलीस विभागाची कार्यप्रणाली व सविस्तर माहिती देणारा अंक आहे. हा लोकराज्य पोलीस विशेषांक पोलीस दलाला प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्गार जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी येथे काढले.
सिंधुदुर्गनगरी : माहिती व जनसंपर्क विभागामार्फत प्रकाशित होणारा जानेवारी महिन्याचा लोकराज्यचा अंक पोलीस विभागाची कार्यप्रणाली व सविस्तर माहिती देणारा अंक आहे. हा लोकराज्य पोलीस विशेषांक पोलीस दलाला प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्गार जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी येथे काढले.
सायबर गुन्हे आणि सायबर सुरक्षा या विषयांवर या अंकामध्ये मोलाची माहिती पुरविण्यात आली आहे. नागरिकांनी पोलीस आपल्या सुरक्षेसाठी कसे तत्पर असतात आणि त्यांची कार्यपद्धती कशी चालते हे जाणून घेण्यासाठी हा अंक नक्की वाचावा. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनीही लोकराज्य या मासिकाचे जास्तीत जास्त वर्गणीदार व्हावे, असे आवाहन गायकवाड यांनी केले.
लोकराज्य पोलीस विशेषांक या जानेवारी महिन्याच्या अंकाचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते मंगळवारी प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या अंकामध्ये पोलीस दलाची माहिती देण्यात आली आहे. तसेच पोलिसांचे कार्य विभाग, त्यांचे संपर्क क्रमांक, दक्षता विभाग आणि तातडीच्या प्रसंगी करावयाच्या संपर्क क्रमांकांचाही या अंकामध्ये समावेश आहे.
याशिवाय गुन्ह्यांची उकल करण्यासाठी तंत्रज्ञानाचा होणारा वापर आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आलेले पोलिसांचे विशेष विभाग यांचीही माहिती या अंकामध्ये देण्यात आली आहे.
जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना, पोलीस दलाच्या कार्याचे कौतुक केले. तसेच रेल्वे पोलिसांनी आतापर्यंत पाच हजार मुले व तीन हजार हरवलेल्या मुलींची त्यांच्या पालकांशी भेट घडवून आणल्याचेही बांदिवडेकर यांनी सांगितले.
राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये यश प्राप्त केलेल्या खेळाडूंसोबत पोलीस दलाच्या क्रीडा विभागाचे प्रमुख एस. बी. डिचोलकर यांच्यासह एस. जे. पाटील, एस. जी. चिपकर, आर. बी. केरेखोलकर, एस. एस. सावंत यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंचा सत्कार
दरम्यान, यावेळी राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये यश प्राप्त केलेल्या खेळाडूंचा अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यामध्ये क्रीडा क्षेत्रात जिल्हा पोलीस दलाचे नाव उंचावणाऱ्या राहुल काळे यांचाही समावेश आहे.
राहुल काळे यांनी शंभर, दोनशे आणि चारशे रिले या स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. या सोबत सोहित आहिर, बसवराज कुंडगोळ आणि भक्ती शिवलकर या पदक विजेत्यांचाही सत्कार करण्यात आला