सिंधुदुर्ग : स्वाभिमान पक्षाचे बांदा येथे मुंडण आंदोलन, जिल्ह्यात ठिकठिकाणी जनआक्रोश आंदोलने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 04:17 PM2018-03-31T16:17:40+5:302018-03-31T16:17:40+5:30
गोवा शासनाने परप्रांतीय रुग्णांकडून शुल्क आकारण्याच्या निर्णयाविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी जनआक्रोश आंदोलने सुरू आहेत. रुग्णसेवेचा प्रश्न तातडीने सोडविण्यास जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे अपयशी ठरले आहेत. याचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बांदा येथे भर चौकात मुंडण करून निषेध व्यक्त केला.
बांदा : गोवा शासनाने परप्रांतीय रुग्णांकडून शुल्क आकारण्याच्या निर्णयाविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी जनआक्रोश आंदोलने सुरू आहेत. रुग्णसेवेचा प्रश्न तातडीने सोडविण्यास जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे अपयशी ठरले आहेत. याचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बांदा येथे भर चौकात मुंडण करून निषेध व्यक्त केला.
गोवा शासनाने परप्रांतीय रुग्णांकडून शुल्क आकारण्याच्या निर्णयाविरोधात जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून ठिकठिकाणी जनआक्रोश आंदोलने सुरू आहेत. येथील रुग्णसेवा ही पूर्णपणे गोवा राज्यावर अवलंबून असूनही रुग्णसेवेचा प्रश्न तातडीने सोडविण्यास जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर व राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे अपयशी ठरले आहेत.
याला सर्वस्वी जबाबदार असलेल्या लोकप्रतिनिधींचा तसेच विनामूल्य सेवा देण्यास नकार देणारे गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यावर आरोप करीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बांदा येथे भर चौकात मुंडण करून निषेध व्यक्त केला.
यावेळी लोकप्रतिनिधींच्या निषेधाच्या घोषणा देत सामूहिक श्राद्धदेखील घालण्यात आले. बांदा पोलिसांनी ३२ आंदोलनकर्त्यांना तत्काळ ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णसेवेचा प्रश्न हा गंभीर असून लोकप्रतिनिधी मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. गोव्याने रुग्णशुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोडामार्ग तालुक्यात सर्वप्रथम जनआक्रोश आंदोलन सुरू करण्यात आले.
हे आंदोलन सलग दहा दिवस सुरू आहे. त्यानंतर सावंतवाडी, कुडाळ येथेही आंदोलन करण्यात आले आहे. मात्र राज्यशासनाला जाग येत नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठीच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब व उपसरपंच अक्रम खान यांच्या नेतृत्वाखाली अनोखे मुंडण आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
गुरुवारी दुपारी १२ वाजता बांदा येथील कट्टा कॉर्नर चौकात बांद्याचे उपसरपंच अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्य श्याम मांजरेकर, स्वाभिमान पक्षाचे विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत, जिल्हा कार्यकारिणी सदस्य गुरुनाथ सावंत यांनी मुंडण करीत पालकमंत्री दीपक केसरकर व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा जाहीर निषेध केला. तसेच यावेळी सामूहिक श्राद्धदेखील घालण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष संजू परब, पंचायत समितीचे सभापती रवींद्र मडगावकर, सावंतवाडीचे नगरसेवक सुधीर आडिवरेकर, राजू बेग, जावेद खतीब, संदीप बांदेकर, संतोष सावंत, ग्रामपंचायत सदस्या अंकिता देसाई, अरुण देसाई, महिला शहर अध्यक्षा चित्रा भिसे, अनिल पावसकर, प्रशांत पांगम, गौरांग शेर्लेकर, बाळू सावंत, दीपक सावंत, विलास पावसकर, राखी कळंगुटकर, सोनल धुरी, बेला पिंटो, रोहिणी मडगावकर, अलिशा माठेकर, प्रगती माळवदे, ज्योती मुद्राळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. सुमारे अर्धा तास हे आंदोलन करण्यात आले.
त्या कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक कारवाईसह समज; पालकमंत्री निष्क्रिय : संजू परब
बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी ३२ आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. तेथे त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करीत समज देऊन सोडून दिले. स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी पालकमंत्र्यांवर टीका करीत आतापर्यंतचे सर्वात निष्क्रिय पालकमंत्री केसरकर असल्याचा आरोप केला. गोवा शासनाने घेतलेला रुग्णसेवेचा प्रश्न न सुटण्यामागे केसरकर जबाबदार आहेत.केसरकर यांचे गोव्याशी व्यावसायिक हितसंबंध असूनही हा प्रश्न सोडविण्यात ते अपयशी ठरले आहेत.