योग्य मोबदला नाही तोपर्यंत काम नाही, महामार्ग चौपदरीकरणाबाबत नीतेश राणे यांची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 06:30 PM2018-01-24T18:30:10+5:302018-01-24T19:31:38+5:30
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पग्रस्तांना जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाही तसेच त्यांच्या समस्या सुटत नाहीत तोपर्यंत काम सुरु करु देणार नाही.
कणकवली : कणकवली शहरातील मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पग्रस्तांना जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाही तसेच त्यांच्या समस्या सुटत नाहीत तोपर्यंत काम सुरु करु देणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविल्यानंतर त्याचे काय उत्तर आले याची माहिती त्यांनी आम्हाला द्यावी. त्यानंतर पुढील निर्णय आम्ही घेऊ. प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घ्यावे तसेच त्यांच्या समस्या सोडवाव्यात आणि काम सुरु करावे. आमचे काहीच म्हणणे नाही, असे आमदार नीतेश राणे यांनी यावेळी सांगितले.
कणकवली येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अमोल गवळी उपस्थित होते. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात कणकवली विधानसभा मतदार संघातील १०० शाळा डिजिटल करण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ २६ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार नीतेश राणे यांनी येथे दिली.
नीतेश राणे म्हणाले, सध्या स्पर्धेचे युग असून मुलांना अद्ययावत माहिती तसेच तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे यासाठी शाळा डिजिटल होणे गरजेचे आहे. त्यामुळे टाटा ट्रस्टच्या माध्यमातून हा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. २६ जानेवारी रोजी होणाऱ्या शुभारंभ कार्यक्रमाला निवड केलेल्या शाळांचे प्रतिनिधी, शिक्षक , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच पालकांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे भूषविणार आहेत. तसेच माजी खासदार निलेश राणे व इतर लोकप्रतिनिधिही यावेळी उपस्थित रहाणार आहेत. टाटा ट्रस्टचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहून उपक्रमाबद्दल माहिती देणार आहेत.
वाभवे - वैभववाडी शहराचा विकास करण्याची जबाबदारी टाटा ट्रस्टने घेतली आहे. त्याअंतर्गत पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचा शुभारंभही याच दिवशी करण्यात येणार आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना स्पर्धा परिक्षेबद्दल अद्ययावत मार्गदर्शन मिळावे यासाठी युनिक अकादमीच्या माध्यमातून आमचा प्रयत्न सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत हरकुळ बुद्रुक येथील एसएसपीएम इंजिनीअर कॉलेजमध्ये युपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन नारायण राणे करणार आहेत. यावेळी युनिक अकादमीचे संचालक तुकाराम जाधव, प्रवीण चव्हाण, डॉ.अमित अहिरे, देवा जाधवर हे उपस्थित विद्यार्थ्यांना विविध विषयांविषयी मार्गदर्शन करणार आहेत. या प्रशिक्षण शिबिराला विद्यार्थ्यांच्या मिळणाºया प्रतिसादावरुन अभ्यासिका विकसित करणे तसेच कायमस्वरूपी शाखा सुरु करणे याबाबत निर्णय घेण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हावे यासाठी त्याना निमंत्रण देण्यात येणार आहे.
स्पर्धा परिक्षांबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना कोल्हापूर, मुंबई, पुणे अथवा गोवा याठिकाणी जावे लागते. त्यांची ही अडचण लक्षात घेऊन सिंधुदुर्गातच मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शासकीय सेवेत वरिष्ठ अधिकारी म्हणून कोकणातील विद्यार्थ्यांनी आपला पगडा निर्माण करावा यासाठी हे प्रयत्न आहेत. या प्रशिक्षण शिबिराचा लाभ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहनही नीतेश राणे यांनी यावेळी केले.
खासदार विनायक राऊत यांनी याबाबत बोलताना नारायण राणे यांना अमित शहांनी मंत्री पद देतो म्हणून सांगितले होते. ते न दिल्याने राणे प्रकल्पाला विरोध करीत असल्याचे सांगितले आहे. मात्र, खासदारांकडे याबाबत पुरावे असतील तर त्यांनी ते द्यावेत. उगाचच हवेत तीर मारू नये. याउलट मुख्यमंत्र्यानी याबाबत वक्तव्य केल्यावर राऊत यांनी त्यांच्यावर हक्कभंग आणणार असल्याचे जाहीर केले होते. तो हक्कभंग का आणला नाही? की मुख्यमंत्री बोलले होते ते खरे आहे. त्यामुळे खासदारांनी पुढील कृती केली नाही. याबाबत त्यांनी जनतेला उत्तर द्यावे
- नीतेश राणे
ग्रीन रिफायनरीबाबत शिवसेनेची ही तर सर्व मिलीभगत
ग्रीन रिफायनरीबाबत संशयाचा भोवरा शिवसेनेकडे वळत आहे. शिवसेना या प्रकल्पाला एकीकडे विरोधासाठी सभा घेत आहे.
दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे उद्योगमंत्री याबाबत काहीच बोलायला तयार नाहीत. त्यांच्याच अखत्यारित असलेले उद्योग खातेच संबधिताना नोटिसा काढत आहे. त्यामुळे शिवसेनेची ही सर्व मिलीभगत आहे. एका बाजूने विरोध करायचा आणि दुसऱ्या बाजूने समर्थन. मुंबई येथील हुक्का पार्लरना शिवसेनेचा वरदहस्त आहे. याबाबतचे पुरावे आमच्याकडे असून येत्या अधिवेशनात ते मांडणार असल्याचे आमदार नीतेश राणे यांनी सांगितले.
जठार यांची भूमिका लँड एजंट म्हणून का ?
ग्रीन रिफायनरीबाबत माजी आमदार प्रमोद जठार यांनी मांडलेली भूमिका ही भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून मांडली आहे का? की त्यांनी 'लँड एजंट' म्हणून भूमिका मांडली आहे. हे समजायला मार्ग नाही. ही भाजपची अधिकृत भूमिका नाही. मुख्यमंत्री जी भूमिका जाहीर करतील तीच अधिकृत असेल. कोकणावर प्रेम करणारी व्यक्ती कधीही ग्रीन रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही. त्याठिकाणी हॉस्पिटल का बांधले जाणार आहे? काही तरी घटना घडावी आणि तेथील लोकांनी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे अशी त्यांची इच्छा आहे का? याचे त्यांनी उत्तर द्यावे.
विजयदुर्ग महोत्सवाच्यावेळी जठार यांनी जनतेला हा प्रकल्प नको असेल तर तो रद्द करणार असे सांगितले होते. मग आता त्यांची भूमिका का बदलली ? असा सवाल नीतेश राणे यांनी यावेळी उपस्थित केला. कणकवली विधानसभा मतदारसंघातील प्रमुख शहरात बसविलेल्या सीसीटीव्हीच्या यंत्रणेचा कार्यकाल संपला आहे. त्यामुळे बंद स्थितीत असलेल्या या यंत्रणेचे नूतनीकरण येत्या तीन महिन्यात करण्यात येईल. मात्र, या यंत्रणेच्या वायर कापणे तसेच अन्य साहित्याची नासधूस करण्याचे प्रकार समोर येत आहेत.