सिंधुदुर्ग पोलीस भरती : शारीरिक चाचणीत ४२ उमेदवार अपात्र, १२७ जण बाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 06:12 PM2018-03-15T18:12:00+5:302018-03-15T18:12:00+5:30
सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड मैदानावर अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्तात व इन कॅमेरा पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. एकूण ३ हजार उमेदवारांना बोलविण्यात आले होते. यात सकाळच्या सत्रात १५०० उमेदवारांपैकी १०२० उमेदवार हजर राहिले तर ४८० उमेदवार अनुपस्थित राहिले. शारीरिक चाचणीत ४२ उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांत शारीरिक चाचणीत १२७ उमेदवार बाद झाले आहेत.
सिंधुदुर्गनगरी : येथील पोलीस परेड मैदानावर अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्तात व इन कॅमेरा पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. एकूण ३ हजार उमेदवारांना बोलविण्यात आले होते.
सकाळच्या सत्रात १५०० उमेदवारांपैकी १०२० उमेदवार हजर राहिले तर ४८० उमेदवार अनुपस्थित राहिले. शारीरिक चाचणीत ४२ उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांत शारीरिक चाचणीत १२७ उमेदवार बाद झाले आहेत.
जिल्ह्यात रिक्त होणाऱ्या ७१ पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेत राज्यभरातून हजारो उमेदवार सिंधुदुर्गनगरी येथे दाखल झाले आहेत. ही भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकरित्या राबविली जात आहे.
सोमवारी दिवसभरात २२२५ उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यापैकी ११३४ उमेदवार शारीरिक चाचणीत पात्र ठरले तर ८५ उमेदवार अपात्र ठरले होते. तर काही उमेदवार गैरहजर राहिले तर शेकडो उमेदवारांना प्रवेशपत्र न मिळाल्याने मोठ्या गैरसोईंना सामोरे जावे लागले.
आज सकाळ व दुपार अशा दोन सत्रात प्रत्येकी १५०० नुसार दिवसाला ३ हजार उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यापैकी सकाळच्या सत्रात १५०० पैकी १०२० उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित राहीले तर ४८० उमेदवार अनुपस्थित राहिले. यात ९७८ उमेदवार पुढील चाचणीसाठी पात्र ठरले आहेत. दुपारच्या सत्रातील भरती प्रक्रिया सुरु असून त्याची आकडेवारी अद्याप प्राप्त झालेली नाही.
गेल्या दोन दिवसांपासून भरती ठिकाणच्या प्रवेशद्वारावर अधिकारी, कर्मचारी उमेदवारांची कागदपत्राची पडताळणी करून मैदानी चाचणीसाठी पुढे पाठवत आहेत. पुल अॅप्स, १०० व १६०० मीटर धावणे, लांब उडी, गोळा फेक हे मैदानी प्रकार घेतले जात आहेत.
सिंधुदुर्गनगरीत सुरू असणारी पोलीस भरती ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली होत आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेत शंभर टक्के पारदर्शकता येऊन इतर गैरप्रकारांनाही आळा बसला आहे.