सिंधुदुर्ग : दारू वाहतूक करणारे वाहन ताब्यात,एकाला अटक, उत्पादन शुल्कची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 03:02 PM2018-08-30T15:02:22+5:302018-08-30T15:05:12+5:30
कुडाळ झाराप येथे बेकायदेशीररित्या वाहतूक करणाऱ्या वाहनावर केलेल्या कारवाईत ७६ हजार ८०० रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूसह १२ लाख ७६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने २८ आॅगस्ट रोजी रात्री कुडाळ झाराप येथे बेकायदेशीररित्या वाहतूक करणाऱ्या वाहनावर केलेल्या कारवाईत ७६ हजार ८०० रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूसह १२ लाख ७६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अवैध दारू वाहतूक प्रकरणी वाहनचालक तुकाराम रामचंद्र नाईक (२२, रा. आरोस-गिरोबावाडी, सावंतवाडी) याला अटक करण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नाकाबंदी करण्यात आली होती. दरम्यान रात्री ९.३० वाजता गोव्याहून मुंबईच्या दिशेने वेगात जाणारी निळ्या रंगाची कार (जी. ए. ११, ए - ३१५६) दारूबंदी कायद्यांतर्गत तपासणीसाठी थांबविण्यात आली. या वाहनाच्या डिकीमध्ये व मागील सीटवर गोवा बनावटीच्या दारूचे खोके ठेवण्यात आल्याचे दिसून आले.
या गोवा बनावटीच्या दारुची ७६ हजार ८०० रुपये एवढी किंमत असून या अवैध दारूची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली १२ लाखांची कारही जप्त करण्यात आली आहे. तर अवैध दारू वाहतूक प्रकरणी वाहनचालक तुकाराम रामचंद्र नाईक याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई निरीक्षक एस. एस. साळवे, जवान आर. डी. ठाकुर, मानस पवार, वाहनचालक शिवशंकर मुपडे, एच. आर. वस्त, अवधूत सावंत या भरारी पथकाने केली आहे.
भरारी पथकाची नाकाबंदी
२८ आॅगस्ट रोजी रात्री जिल्ह्यातून गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय उपायुक्तांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी याबाबतची माहिती जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिली होती. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कुडाळ झाराप येथे नाकाबंदी केली होती.