सिंधुदुर्ग : वाळू उपसा यंत्र वेंगुर्लेला द्या, मेरीटाईम बोर्डला निवेदन, वेंगुर्लेतील मच्छिमारांनी केली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 02:27 PM2018-04-20T14:27:42+5:302018-04-20T14:27:42+5:30
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले, मालवण व देवगड या बंदरातील गाळ काढण्यासाठी दिलेले वाळू उपसा यंत्र तारकर्ली खाडी येथे आहे. सध्याची परिस्थिती पाहता या यंत्राची खरी गरज वेंगुर्लेला अधिक आहे. मात्र तारकर्ली ग्रामस्थांचा याला विरोध असल्याने मच्छिमारांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या बंदर अधिकाऱ्यांची भेट घेत वाळू उपसा यंत्र मिळण्यासंदर्भात निवेदन दिले.
वेंगुर्ले : महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले, मालवण व देवगड या बंदरातील गाळ काढण्यासाठी दिलेले वाळू उपसा यंत्र तारकर्ली खाडी येथे आहे. सध्याची परिस्थिती पाहता या यंत्राची खरी गरज वेंगुर्लेला अधिक आहे. मात्र तारकर्ली ग्रामस्थांचा याला विरोध असल्याने मच्छिमारांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या बंदर अधिकाऱ्यांची भेट घेत वाळू उपसा यंत्र मिळण्यासंदर्भात निवेदन दिले.
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे तारकर्ली येथे असलेले वाळू उपसा यंत्र वेंगुर्ले येथे आणून मांडवी खाडी व मुखाजवळील साचलेला गाळ काढण्याची निविदा काढली होती. मात्र त्याची वर्क आॅर्डर काढली नसल्याने याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची वेंगुर्लेतील मच्छिमारांनी भेट घेऊन तारकर्ली ग्रामस्थांचा उपसा यंत्र वेंगुर्लेत नेण्यास विरोध असल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले, मालवण व देवगड या बंदरातील गाळ काढण्यासाठी वाळू उपसा यंत्र दिलेले असताना सुद्धा गेली कित्येक वर्षे हा ड्रेझर तारकर्ली खाडी येथे आहे. सध्याची परिस्थिती पाहता या यंत्राची गरज वेंगुर्लेला आहे. ते यंत्र वेंगुर्लेला मिळावे यासाठी वेंगुर्ले मच्छिमारांनी बंदर अधिकारी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड वेंगुर्ले यांची भेट घेत निवेदन दिले.
यावेळी मच्छिमार संघाचे अध्यक्ष दादा केळूसकर, वेंगुर्ले मच्छिमार सहकारी सोसायटीचे अशोक खराडे व ट्रॉलर मालक संघाचे अध्यक्ष गणपत चोडणकर, ज्ञानेश्वर सागवेकर, दाजी लोणे, सुधाकर वेंगुर्लेकर, जनार्दन कुबल, पांडू मालवणकर तसेच मच्छिमार उपस्थित होते.
यावेळी अत्यावश्यक सदराखाली खाडीमुखाजवळील गाळ उपसा करून मिळण्यासाठी व वाळू उपसा यंत्र समस्येवर तोडगा काढण्यासाठी माजी आमदार राजन तेली, मुख्यकार्यकारी अधिकारी महाराष्ट्र मेरीटाईम मुंबई बोर्डची भेट घेणार आहेत, असे सांगण्यात आले.