सिंधुदुर्ग : रिक्षा व्यावसायिकांनी महामार्गाचे काम रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 04:28 PM2018-05-22T16:28:25+5:302018-05-22T16:28:25+5:30
महामार्गाच्या चौपदरीकरण कामासाठी काढलेल्या पर्यायी मार्गामुळे झालेल्या नुकसानीला कंटाळून तळेरे, कासार्डे व कणकवली येथील सहा आसनी रिक्षा व्यावसायिकांनी कासार्डे येथील के. सी. सी. बिल्डकॉन प्रा. लि. या कंपनीच्या चौपदरीकरण कार्यालयात जाऊन आंदोलन करीत महामार्गाचे काम रोखले.
तळेरे : महामार्गाच्या चौपदरीकरण कामासाठी काढलेल्या पर्यायी मार्गामुळे झालेल्या नुकसानीला कंटाळून तळेरे, कासार्डे व कणकवली येथील सहा आसनी रिक्षा व्यावसायिकांनी कासार्डे येथील के. सी. सी. बिल्डकॉन प्रा. लि. या कंपनीच्या चौपदरीकरण कार्यालयात जाऊन आंदोलन करीत महामार्गाचे काम रोखले.
चौपदरीकरण कामामुळे अनेक ठिकाणी पर्यायी मार्ग केला असून त्याचे डांबरीकरण न झाल्याने प्रवाशांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक रिक्षा व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. येत्या आठ दिवसांत या मार्गाचे डांबरीकरण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर रिक्षा व्यावसायिकांनी आंदोलन मागे घेतले.
याबाबत माहिती अशी की, सध्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी पर्यायी मार्ग काढलेले आहेत. मात्र, या पर्यायी मार्गाचे डांबरीकरण न करता तो फक्त खडी टाकून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरून जाताना दुचाकी तसेच चारचाकी वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागते.
तसेच, अशा पर्यायी मार्गाला कोणतीही पातळी नसल्यामुळे प्रवास करायचा म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे या पर्यायी मार्गाचे डांबरीकरण केले पाहिजे, अशी मागणी सहा आसनी रिक्षा व्यावसायिकांकडून करण्यात आली. तसेच, आजपर्यंत या रिक्षांच्या काचा फुटल्या त्याची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणीही करण्यात आली.
चौपदरीकरण कामासाठी काढलेले पर्यायी मार्ग हे वळणाचे आहेत. या मार्गांचे योग्य काम न झाल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा पर्यायी मार्गांचे डांबरीकरण करावे. तसेच रिक्षा व्यावसायिकांचे झालेले नुकसान या कंपनीकडून मिळावे, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी या कंपनीकडून पर्यायी मार्गाचे ३० मे पूर्वी डांबरीकरण करून देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले तर नुकसान भरपाई संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून संबंधित रिक्षा व्यावसायिकांना कळविण्यात येईल, असे लेखी पत्र या देण्यात आले.