सिंधुदुर्ग : महामार्गाचे काम पुन्हा थांबविले, ओसरगाव ग्रामस्थ आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 02:23 PM2018-06-20T14:23:10+5:302018-06-20T14:23:10+5:30
कणकवली शहरासह तालुक्यात दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ओसरगाव येथील महामार्गावर पावसाचे पाणी साचले होते. तसेच भरावाची माती लगतच्या शेतीत गेल्याने ओसरगावचे सरपंच प्रमोद कावले आणि शेतकऱ्यांसह, ग्रामस्थांनी ठेकेदाराला जाब विचारला. आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी पुन्हा महामार्गावरील काम बंद पाडत गाड्या अडविल्या.
कणकवली : शहरासह तालुक्यात दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ओसरगाव येथील महामार्गावर पावसाचे पाणी साचले होते. तसेच भरावाची माती लगतच्या शेतीत गेल्याने ओसरगावचे सरपंच प्रमोद कावले आणि शेतकऱ्यांसह, ग्रामस्थांनी ठेकेदाराला जाब विचारला. आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी पुन्हा महामार्गावरील काम बंद पाडत गाड्या अडविल्या.
महामार्गावर ओसरगाव देऊळवाडी येथे महामार्गाचे काम सुरु आहे. सोमवारीही महामार्गावरील पाणी व माती शेतात गेल्याने नुकसानी झाली होती. मंगळवारीही सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे महामार्गावरील माती शेतात गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले.
महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने यंत्राच्या सहाय्याने जवळ असलेल्या वहाळातील पाईप फोडल्याने तसेच वहाळाच्या मुखावरच माती गेल्याने पाण्याचा मार्ग बंद झाल्यामुळे महामार्गावरच पावसाचे पाणी साचले.
त्यामुळे महामार्गावरील सर्व माती महामार्गाच्या बाजूला असलेल्या शेतीत गेल्याने नुकसान झाले.
याचा जाब ओसरगाव येथील सुनील राणे, आदित्य मोरे, आपटे आदी ग्रामस्थांसह सरपंच प्रमोद कावले यांनी ठेकेदाराला विचारला. त्यावेळी ठेकेदाराने शेतीची झालेली नुकसानी देण्याचे आश्वासन दिले. ठेकेदाराच्या आश्वासनानंतर वातावरण शांत झाले.
त्यानंतर ठेकेदाराने महामार्गाच्या कामास सुरुवात केली. गेले दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे मात्र महामार्ग चिखलमय झाला आहे. महामार्गावरील गाड्या इतर मार्गाने नेण्यात आल्या. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून कामाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
महामार्गावर सुरु असलेल्या कामामुळे शेतीत माती गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. याचा जाब ग्रामस्थांसह ओसरगावचे सरपंच प्रमोद कावले यांनी विचारला.