सिंधुदुर्ग : पालकमंत्र्यांच्या विरोधात उभादांडा येथे घोषणाबाजी, काळे झेंडे दाखवत ग्रामस्थांनी केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 01:26 PM2018-03-12T13:26:35+5:302018-03-12T13:26:35+5:30
अनधिकृत वाळू उपसा होत असून त्याला पालकमंत्र्यांचे अभय असल्याचा आरोप करीत आरवली, मोचेमाड, टांक, अणसूर, पाल येथील ग्रामस्थांनी उभादांडा शाळा नं. २ येथे काळे झेंडे दाखवत व पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला.
वेंगुर्ले : वाळू उपसा बंदी ही एका हॉटेल व्यावसायिकाच्या पाठीशी राहून केलेली आहे. काही ठिकाणी अनधिकृत वाळू उपसा होत असून त्याला पालकमंत्र्यांचे अभय असल्याचा आरोप करीत आरवली, मोचेमाड, टांक, अणसूर, पाल येथील ग्रामस्थांनी उभादांडा शाळा नं. २ येथे काळे झेंडे दाखवत व पालकमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला.
पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरुन वाळू उपशास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याचे कारण टांक येथील बड्या हॉटेल व्यावसायिकांशी पालकमंत्री दीपक केसरकर यांचे हितसंबंध आहेत. त्यामुळे आरवली, मोचेमाड, टांक, अणसूर-पाल येथील वाळू व्यावसायिकांच्या रोजीरोटीवर परिणाम झालेला आहे.
आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य वाळू व्यावसायिकांना ते न्याय देऊ शकत नसल्याने सुमारे ५० वाळू व्यावसायिकांनी पालकमंत्री केसरकर हे उभादांडा येथील मंगेश पाडगांवकर आदरांजली कार्यक्रम आटोपून जात असताना काळे झेंडे व निषेधाच्या घोषणा देत आंदोलन छेडले.
निषेधाच्या घोषणा व काळे झेंडे पाहून पालकमंत्र्यांनी वेंगुर्ले शहरात येण्याचा दौरा रद्द करुन ते शिरोड्याच्या दिशेने निघून गेले. पालकमंत्री केसरकर यांनी आपला मार्ग आमच्या आंदोलनामुळे बदलला हा आमचा विजय असल्याची प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.