सिंधुदुर्ग : हो... ऐन चतुर्थीत पूर्णपणे कॅशलेस एटीएम, गणेशोत्सवात तीन दिवसांत पैसेच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 02:07 PM2018-09-17T14:07:13+5:302018-09-17T14:11:12+5:30
कणकवली तालुक्यातील तळेरे येथील बँक आॅफ इंडिया आणि बँक आॅफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये पैसेच नाहीत. नो कॅश असा फलक तेथे लावण्यात आलेला असल्याने अनेक गणेशभक्त व चाकरमानी यांची गैरसोय होत आहे.
सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील तळेरे येथील बँक आॅफ इंडिया आणि बँक आॅफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये पैसेच नाहीत. नो कॅश असा फलक तेथे लावण्यात आलेला असल्याने अनेक गणेशभक्त व चाकरमानी यांची गैरसोय होत आहे.
एटीएम सेंटर असूनही त्यामध्ये पैसेच मिळत नसल्याने केंद्र शासनाच्या कॅशलेस योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी करणारे हे आगळेवेगळे एटीएम सेंटर असल्याचे काहींनी बोलून दाखविले. यामुळे चाकरमानी गणेशभक्तांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
तळेरे हे अनेकांसाठी सोयीचे ठिकाण आहे. बाजार, बँका व इतर अनेक कामांसाठी तळेरे बाजार हा सर्वांनाच सोईस्कर आहे. त्यासाठी तळेरे दशक्रोशीतील असंख्य ग्राहक व गणेशभक्त तळेरे बाजाराला पसंती देतात.
गणेशोत्सव, दिवाळी व मे महिन्यातील उन्हाळी सुटीत येणाऱ्या चाकरमानी व पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी तळेरे येथे बँक आॅफ इंडियाचे एटीएम सेंटर उघडण्यात आले. मात्र, ते ऐन हंगामात गैरसोयच करण्याचे काम करीत असल्याचे अनेकदा निदर्शनास येते. किंबहुना तसा अनेकांचा अनुभव असल्याचे अनेकांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या कॅशलेस योजनेनुसार देशातील हे पहिले एटीएम सेंटर असेल की जास्तवेळ या एटीएममध्ये पैसेच नसतात. म्हणजेच हे कॅशलेस एटीएम सेंटर असल्याने यामुळे अनेकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अनेकांना या एटीएम सेंटरची माहिती असल्यामुळे शिवाय तळेरे हे ठिकाण सर्वांनाच सोईचे असल्याने या एटीएमवरच अनेकजण अवलंबून असतात. मात्र, ऐन गरजेच्यावेळी या एटीएममध्ये पैसे नसल्याने मोठी गैरसोय होते.
या एटीएमच्या असल्या भोंगळ कारभारामुळे सर्वचजण त्रस्त झाले आहेत. यामुळे आपलेच पैसे वेळेवर मिळत नसतील तर असल्या सुविधाच बंद कराव्यात, अशीही चर्चा सुरू आहे.
ग्राहकांमध्ये प्रचंड संताप
विशेष म्हणजे दरवेळी अशा ऐन हंगामात या एटीएममध्ये पैसे नसतात किंवा तांत्रिक बिघाड झालेला असतो. मात्र, त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यानेच सध्या असंख्य ग्राहकांची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे याकडे बँकेचे अधिकारीही लक्ष देत नसल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड संताप आहे. अनेक ग्राहक मोठ्या आशेने या एटीएमकडे येतात आणि नो कॅशचा फलक बघून हताश होऊन जातात.
तळेरे येथे बँक आॅफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम सेंटर आहे. मात्र, आपल्या एटीएम कार्डच्या बँकेचे एटीएम असताना दुसऱ्या बँकेच्या सेंटरमधून पैसे का काढावेत? शिवाय, व्यवहार जास्त झाल्यास त्याचे शुल्क भरायचे कोणी? असे प्रश्न विचारले जात आहेत.