सिंधुदुर्गनगरी अंशकालीन स्त्री परिचर संघटनेचा मोर्चा
By admin | Published: August 26, 2014 09:30 PM2014-08-26T21:30:10+5:302014-08-26T21:49:08+5:30
जिल्हा परिषद : विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी लक्ष वेधर्ले
सिंधुदुर्गनगरी : अंशकालीन स्त्री परिचर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कल्याण अंशकालीन स्त्री परिचर कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कल्याण अंशकालीन स्त्री परिचर कर्मचारी संघटनेच्यावतीने स्त्री परिचर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अंशकालीन स्त्री परिचर संघटनेच्या अध्यक्षा उषा लाड, सचिव अर्चना महाले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी ओरोस रवळनाथ मंदिर ते जिल्हा परिषद भवन असा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये सुमारे ७० स्त्री परिचर सहभागी झाल्या होत्या.
शासनाच्या आरोग्याच्या योजना पोहोचविण्याचे काम करणाऱ्या अंशकालीन स्त्री परिचरांना जिल्हा परिषद सरळसेवा भरतीमध्ये १९८५ पर्यंत असलेले आरक्षण पूर्ववत लागू करणे, सध्याच्या महागाईच्या निर्देशानुसार ७ हजार रुपये मानधन फरक देणे आदी मागण्यांकडे वेळोवेळी लक्ष वेधूनही शासनाकडून दखल घेतली जात नाही याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंशकालीन स्त्री परिचर कर्मचारी संघटनेने मोर्चा काढला होता. (प्रतिनिधी)