....तर जिल्ह्यातील ४७४ प्राथमिक शाळा होणार बंद?
By admin | Published: May 7, 2015 11:50 PM2015-05-07T23:50:34+5:302015-05-08T00:14:46+5:30
जिल्हा परिषदेच्या ४७४ प्राथमिक शाळांवर बंद करण्याची टांगती तलवार असून, त्यातील ९४८ शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याने शिक्षकांमध्ये खळबळ
रहिम दलाल - रत्नागिरी विद्यार्थीसंख्या १० किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास शाळा बंद करण्याची शिफारस शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी शासनाकडे केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या ४७४ प्राथमिक शाळांवर बंद करण्याची टांगती तलवार असून, त्यातील ९४८ शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याने शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. याची कारणे वेगवेगळी असली तरी ती शिक्षकांच्या नोकरीवर गदा आणणारी आहे. ग्रामीण भागातही खासगी संस्थांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत चालली आहे.
तसेच नोकरी, धंद्यानिमित्त लोक शहराकडे धाव घेत असतानाच लोकसंख्येचे होणारे कमी प्रमाण, अशी विविध कारणे पटसंख्या कमी होण्यामागे आहेत. तरीही जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक दर्जाचाही विचार केला जात आहे.
आज जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची स्थिती पाहता १ ते ५ पटसंख्या असलेल्या १६६ शाळा आणि ६ ते १० पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या ३०८ आहे. त्यामुळे या शाळांमधील कमी होणारी पटसंख्या ही चिंतेची बाब झाली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळत असतानाही विद्यार्थी संख्या कमी होत चालल्याने भविष्यात या शाळा बंद होतील.
नवीन शाळा, तुकड्या सुरु करणे, मंजूर करणे व त्या टिकविणेबाबतचे निकष ठरविण्याबाबत अधिक स्पष्टता येण्यासाठी सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीने शासनाला अहवाल सादर केला होता. त्यानंतर प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये केंद्र शासनाच्या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ प्रमाणे प्राथमिक शाळांमध्ये १ ते १० विद्यार्थी असलेल्या प्राथमिक शाळा बंद करण्याची शिफारस शासनाकडे केली आहे.
प्रधान सचिवांच्या या शिफारशींची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १ ते १० पटसंख्या असलेल्या ४७४ शाळांवर बंदची टांगती तलवार आहे. त्या शाळांमधील ९४८ शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. त्यांचे समायोजन अन्य शाळांमध्ये करण्यात येईल. तसेच २६ पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ६ ते ८वीपर्यंतच्या शाळाही बंद होणार आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.
जिल्हा परिषदेच्या २७३३ प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये २५६२ मराठी माध्यम आणि १७१ उर्दू माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. १ ते १० पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळा बंद करण्याची अंमलबजावणी झाल्यास उर्दूच्या निम्म्यापेक्षा जास्त शाळा बंद होतील. त्यानंतर या शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरल्यास त्यांचे समायोजन कोठे करणार, हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.