सोनुर्ली माऊलीचा जत्रोत्सव उत्साहात
By admin | Published: November 26, 2015 09:18 PM2015-11-26T21:18:36+5:302015-11-27T00:14:11+5:30
हजारो भाविकांनी घेतले दर्शन : उत्कृष्ट नियोजनाचे भाविकांतून समाधान
रामचंद्र कुडाळकर - तळवडे संपूर्ण राज्यभर प्रसिध्द असलेल्या, दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा जत्रोत्सव गुरुवारी थाटात संपन्न झाला. मुंबई, गोवा, कर्नाटक व इतर विविध ठिकाणाहून आलेल्या हजारो भक्तगणांनी जत्रोत्सवात देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. दरवर्षीपेक्षाही भाविकांची संख्या यंदा वाढली असून, प्रशासनाच्या सोयीसुविधांमुळे यंदाच्या जत्रोत्सवात कसलीही अडचण आली नाही. उत्कृष्ट नियोजनामुळे यंदा देवीचे दर्शन व वाहनांची कोंडीही जाणवली नसल्याने भाविकांतून नियोजन व्यवस्थापनाबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.
सोनुर्ली माऊलीच्या वार्षिक जत्रोत्सवाच्या दिवशी सकाळी देवीच्या पाषाणावर परंपरेप्रमाणे अभिषेक करण्यात आला. शास्त्रोक्त पध्दतीने पूजा करून सोन्या-चांदीच्या वस्त्रालंकारांनी देवीची मूर्ती सजविण्यात आली. परंपरेनुसार धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर दर्शनासाठी भक्तगणांना सोडण्यात आले. सकाळी सहा वाजल्यापासूनच मंदिर परिसरात भक्तांची गर्दी झाली होती.
हळूहळू ही भक्तांची संख्या वाढू लागल्याने नियोजित करण्यात आलेल्या रांगामधून भाविकांना दर्शनासठी सोडण्यात आले. संपूर्ण मंदिराभोवती भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. जत्रोत्सवात कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ेजत्रोत्सवात ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
दर्शनाकरिता उत्कृष्ट नियोजन
माऊलीच्या भक्तांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी मंडपही उभारण्यात आला होता. तसेच महिला भाविकांसह आबालवृध्दांनाही देवीचे दर्शन व्हावे, यासाठी पोलीस आणि स्वयंसेवकांच्या मदतीने नियोजनबध्द रांगा तयार करण्यात आल्या होत्या.
अद्वितीय लोटांगण सोहळा
‘लोटांगणाची जत्रा’ म्हणून विशेष प्रसिध्द असलेल्या सोनुर्ली जत्रोत्सवात शेकडो भाविकांनी देवीच्या चरणी लोटांगण घालून नवसफेड केली. सिंधुदुर्गातील भक्तांसह जिल्ह्याबाहेरील भाविकांनीही यावेळी लोटांगण घालण्यासाठी गर्दी केली होती.