तारकर्ली स्कुबा सेंटरमध्ये आता अभ्यासाचे धडे ?
By admin | Published: January 23, 2016 11:45 PM2016-01-23T23:45:16+5:302016-01-23T23:45:16+5:30
मुंबई विद्यापीठाशी संलग्न असे अभ्यासक्रम तारकर्ली येथे सुरू होणार
मालवण : तारकर्ली येथे उभारणी करण्यात आलेल्या भारतातील एकमेव अशा स्कुबा डायव्हिंग सेंटर येथे आता पर्यटनाबरोबर आता अभ्यासक्रमाचेही धडे गिरविले जाणार आहेत. सागरी पर्यटन अभ्यासक्रम, सागरी जीव संशोधन, प्रशिक्षण या विषयावर पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरूकरण्याबाबत राज्य शासन विचाराधीन असून, मुंबई विद्यापीठाशी संलग्न असे अभ्यासक्रम तारकर्ली येथे सुरू होणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या पर्यटन महामंडळाच्या बैठकीत याबाबत अंतिम रूप देण्यात आले आहे. लवकरच स्कुबाच्या अभ्यासक्रमाची घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. दरम्यान, तारकर्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ एकयुटिक स्पोर्टस् (इसदा) चे प्रमुख डॉ. सारंग कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. सिंधुदुर्गातील स्कुबा डायव्हिंग जागतिक दर्जाचे बनविताना तारकर्ली स्कुबा डायव्हिंग ही भारताची स्कुबा डायव्हिंग राजधानी बनविण्याचा मानस त्यांनी व्यक्तकेला.
प्रशिक्षणार्थींचे अर्ज आजपासून उपलब्ध
२० तज्ज्ञ स्कुबा डायव्हरची पहिली टीम आगामी तीन महिन्यांच्या कालखंडात प्रशिक्षण देऊन तयार होणार आहे. यासाठी दोन लाख रुपये प्रशिक्षण खर्च आहे; मात्र यापैकी एक लाख रुपये रक्कम युएनडीपी व ५० हजार रुपये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अनुदान स्वरुपात देणार आहे.
केवळ ५० हजार या अल्प दरात २० जण प्रशिक्षित म्हणून पर्यटकांच्या सेवेत दाखल होतील. आज, रविवारी ते २८ जानेवारीपर्यंत याबाबतचे अर्ज तारकर्ली स्कुबा डायव्हिंग सेंटर येथे उपलब्ध असणार आहे व अटी शर्तींची पूर्तता करून २० जण प्रशिक्षणासाठी निवडले जाणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
(प्रतिनिधी)
नवीन स्कुबा ठिकाणांचे संशोधन
सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मालवण, देवगड व वेंगुर्ला या ठिकाणी स्कुबा डायव्हिंगच्या नवीन ठिकाणांचे संशोधन केले जाणार आहे. देशी-विदेशी पर्यटकांच्या तसेच समुद्री पर्यावरणाच्या सुरक्षेला प्राधान्य देताना प्रशिक्षित स्कुबा डायव्हिंग गाईडची टीम बनविण्यात येणार आहे. तारकर्ली स्कुबा डायव्हिंग या ठिकाणी ‘झिरो ते हीरो’ या संकल्पनेखाली २० तज्ज्ञ स्कुबा डायव्हर बनविण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. सारंग कुलकर्णी यांनी दिली.