महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळला
By admin | Published: June 12, 2017 01:15 AM2017-06-12T01:15:50+5:302017-06-12T01:15:50+5:30
बांदा मुस्लिमवाडी येथील घटना : शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार
बांदा : बांदा शहरातील मुस्लिमवाडी भराड येथील दाट झाडीत रविवारी दुपारी बांदा-देऊळवाडी येथील मच्छीविक्रेत्या किशोरी कृष्णा सावंत (वय ५0) यांचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. रविवारी पहाटे साडेपाच वाजता प्रातर्विधीसाठी घराबाहेर पडलेल्या किशोरी सावंत या झाडीत संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळल्याने स्थानिकांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. सोमवारी मृतदेहाचे विच्छेदन केल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. बांदा पोलीस घातपाताच्या शक्यतेने सखोल चौकशी करीत आहेत.
किशोरी सावंत यांच्या मृतदेहापासून सुमारे १00 फूट अंतरावर त्यांची छत्री व विजेरी सापडल्याने त्यांच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय अधिकच बळावला आहे. मृत किशोरी सावंत या बांदा शहरात गेली कित्येक वर्षे मच्छी विक्रीचा व्यवसाय करत होत्या. पतीच्या निधनानंतर त्यांनी हलाखीच्या परिस्थितीत संसार उभा केला होता. मेहनतीच्या जोरावर त्यांनी मच्छी व्यवसायात जम बसविला. त्यामुळे त्या सर्वांच्या परिचित होत्या. रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्या घरातून प्रातर्विधीसाठी बाहेर पडल्या होत्या. यावेळी त्यांनी छत्री व विजेरी सोबत घेतली होती. त्या उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांची मुलगी करिश्मा सावंत हिने त्यांची देऊळवाडीतील शेजाऱ्यांकडे शोधाशोध केली. मात्र त्या आढळून आल्या नाहीत.
सकाळी १0 वाजेपर्यंत किशोरी सावंत यांची लगतच्या परिसरात शोधाशोध केल्यानंतर स्थानिकांनी मच्छीमार्केट परिसरात त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रविवारी दुपारपर्यंत त्यांचा शोध सुरुच होता. स्थानिक युवकांना संशय आल्याने त्यांनी मुस्लिमवाडी भराडावर त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास भराडावरील एका झाडीच्या लगत युवकांना किशोरी सावंत यांची छत्री व विजेरी सापडली. त्यांनी लगतच्या झाडीत शोधाशोध केली असता दाट झाडीत किशोरी सावंत या मृतावस्थेत आढळल्या. त्यावेळी त्यांच्या नाकातून रक्त येत होते, तसेच गळ्यावर व्रण असल्याचे निदर्शनास आले.
युवकांनी याची कल्पना स्थानिकांना दिल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. किशोरी सावंत यांचा मृतदेह दाट झाडीत उताण्या स्थितीत होता. किशोरी सावंत यांचे दीर जयघोष सावळाराम सावंत यांनी याची कल्पना बांदा पोलिसांना दिल्यानंतर बांदा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मोरगाव प्राथमिक आरोग्यकेंद्रात पाठविला.
किशोरी सावंत यांच्या मृतदेहाशेजारी असलेल्या जमिनीवर झटापट झाल्याच्या खुणा आढळल्या आहेत. मृतदेह मोरगाव प्राथमिक आरोग्यकेंद्र येथे नेण्यात आला असून सोमवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे बांदा पोलिसांनी सांगितले. किशोरी सावंत यांच्या पश्चात मुुलगा, दोन मुली, दीर असा परिवार आहे.
बांदा पोलीस सर्व शक्यता पडताळून पाहणार : योगेश जाधव
घटनास्थळावरील परिस्थितीवरुन किशोरी सावंत यांचा मृत्यू हा संशयास्पद वाटत असून जोपर्यंत शवविच्छेदनाचा अहवाल मिळत नाही तोपर्यंत आम्ही सर्व शक्यता पडताळून पाहणार असल्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव यांनी सांगितले. मृत सावंत यांचे शेजारील व्यक्ती किंवा नातेवाईकांशी भांडण होते का? किंवा त्यांचे व्यावसायिक, जमीन-जुुमल्यावरुन भांडण होते का? चोरीच्या उद्देशाने त्यांचा घातपात करण्यात आला आहे का? याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत या सर्व प्राथमिक शक्यता असून सखोल चौकशी केल्यानंतरच तपासाला दिशा मिळणार असल्याचे योगेश जाधव यांनी सांगितले.