मालवणात स्वाभिमानकडून स्वच्छता, श्रमदानातून मोहीम, ग्रामीण रुग्णालय परिसरातील झाडीझुडपे तोडून साफसफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 05:57 PM2017-12-14T17:57:41+5:302017-12-14T18:04:38+5:30
मालवण ग्रामीण रुग्णालय येथील शवविच्छेदनगृह परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडीझुडपे वाढल्याने अनेकदा नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिकांची ही अडचण दूर करण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने सकाळी शवविच्छेदनगृह परिसरात वाढलेली झाडीझुडपे तोडून श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
मालवण : मालवण ग्रामीण रुग्णालय येथील शवविच्छेदनगृह परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडीझुडपे वाढल्याने अनेकदा नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिकांची ही अडचण दूर करण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने सकाळी शवविच्छेदनगृह परिसरात वाढलेली झाडीझुडपे तोडून श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत शहरातील स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. साफसफाई दरम्यान एक ट्रॅक्टर भरून प्लास्टिक कचरा तर पाच ते सहा ट्रॅक्टर अन्य झाडीझुडपांच्या स्वरुपातील कचरा जमा झाला. मालवण शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचा शवविच्छेदनगृहाच्या शेजारचा परिसर मोठ्या प्रमाणावर झाडीझुडपांनी वेढलेला होता.
त्याचप्रमाणे याठिकाणी प्लास्टिक कचऱ्याचाही खच साठला होता. यामुळे तालुक्यातील शवविच्छेदनासाठी येणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याठिकाणी मृतदेहासाठी आणण्यात येणारी रुग्णवाहिका उभी करण्यासाठी झाडीझुडपांमुळे जागा शिल्लक राहिली नव्हती.
रात्री-अपरात्री शवविच्छेदनासाठी येणाऱ्या नागरिकांना तर या परिसरापासून दूर रस्त्यावर उभे रहावे लागत असे. ही बाब लक्षात येताच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदनगृह परिसर झाडीझुडपे आणि कचरामुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले होते. तालुकाध्यक्ष मंदार केणी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी शवविच्छेदनगृह परिसरात जमत स्वयंस्फूर्तीने स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली.
यावेळी तालुकाध्यक्ष मंदार केणी यांच्यासह माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक यतीन खोत, नगरसेवक दीपक पाटकर, ममता वराडकर, दीपाली वायंगणकर, विलास मुणगेकर, चारुशीला आचरेकर, आबा हडकर, मनोज मयेकर, महेश मयेकर, अभय कदम, सदा चुरी, दिलीप वायंगणकर, समिक्षा चव्हाण, महेश गिरकर, महेश हडकर, उत्तम पेडणेकर, तळाशिलकर यांसह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.