वीज महावितरणचे तीन कोटी थकीत
By Admin | Published: November 16, 2016 11:06 PM2016-11-16T23:06:17+5:302016-11-16T23:06:17+5:30
विभागात कणकवली तालुका आघाडीवर : औद्योगिकीकरण थकबाकीत आचरा प्रथम क्रमांकावर, अभय योजना वीज ग्राहकांना फायदेशीर
प्रदीप भोवड ल्ल कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, कणकवली, मालवण, वैभववाडी, व आचरा या कणकवलीअंतर्गत येणाऱ्या पाच उपविभागातील २४ हजार ४५६ वीज ग्राहकांनी वीज महावितरणला २ कोटी ९४ लाख ३६ हजार रुपयांना थकविले आहे. आॅक्टोबर २0१६ पर्यंतची ही थकबाकी असून आता मात्र १ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या अभय योजनेचा वीज ग्राहकांना चांगला लाभ होणार आहे.
केंद्र सरकारने चलनातून बाद केलेल्या ५00 व १ हजारच्या नोटा २४ नोव्हेंबरपर्यंत वीज कंपनी स्वीकारणार आहे, त्यामुळे ज्यांची वीज बिले थकीत आहेत त्यांना हे ५00 व १ हजार रुपयांच्या नोटा वीज कंपनीकडे भरणा करणे सोयिस्कर होणार आहे. वीज कनेक्शन बंद करण्याची नामुष्की ओढवण्यापेक्षा घरातील ५00 व १ हजारच्या नोटा वीज कंपनीत वीज बिलापोटी भरण्यासाठी सध्या ग्राहक गर्दी करीत आहेत.
ज्या वीज ग्राहकांनी वीज बिल थकविले आहे, त्या वीज ग्राहकांनी ३0 नोव्हेंबरपर्यंत थकीत वीज बिल भरले तर त्यांना मूळ थकबाकीच्या ५ टक्के सवलत मिळणार आहे. ३१ जानेवारी २0१७ पर्यंत बिल भरले तर व्याज व विलंब आकारात १00 टक्के सूट मिळणार आहे. तर १ फेब्रुवारी ते ३0 एप्रिल २०१७ या कालावधीत बिल भरले तर ७५ टक्के सूट मिळणार आहे. ही अभय योजना ३0 एप्रिल २0१७ पर्यंतच सुरू राहणार आहे.
एवढी सवलत देऊनही वीज ग्राहकांनी वीज भरले नाही तर वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन बंद करण्यात येणार आहे. मात्र वीज ग्राहकांशी वाद नको म्हणून वीज कंपनीने समजूतदारपणा घेतला आहे, मात्र थकबाकी वाढत असल्यामुळे वीज कंपनीसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
विजेचा खांब खराब झाल्यास तत्काळ बदलण्यासाठी ग्रामस्थ आरडाओरडा करतात, मात्र थकीत वीज बिल ग्राहक भरत नाहीत याबाबत मात्र कोणीही आवाज उठवत नसल्यामुळे थकीत बिलाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.
घरगुती बिले थकविली
४देवगड तालुक्यात ३ हजार ८८३ वीज ग्राहकांनी २८ लाख ८४ हजार रुपये वीज बिलापोटी थकविले आहेत. कणकवली तालुक्यात ७ हजार ६६२ ग्राहकांनी ६९ लाख ९७ हजार, मालवण तालुक्यात २ हजार ८२१ ग्राहकांनी २१ लाख ४३ हजार, वैभववाडी तालुक्यात २ हजार ८ ग्राहकांनी १७ लाख ६४ हजार, तर आचरा उपविभागात २ हजार २८0 ग्राहकांनी १५ लाख ६४ हजार रुपये थकवले आहेत. घरगुती वीज बिल थकविणारे १८ हजार ६५४ ग्राहक असून त्यांचे एकूण १ कोटी ५३ लाख ५२ हजार वीज बिल थकीत आहे. यात सर्वात जास्त कणकवली तालुक्यात थकबाकीदार आहेत.
सार्वजनिक पाणीपुरवठ्याचे थकबाकीदार
घरगुती, कमर्शियल व्यापारी, उद्योजक, शेतकरी यांच्याबरोबरच सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांनीही वीज कंपनीला थकविले आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या थकबाकीदार वीज ग्राहकांमध्ये देवगड तालुक्यात ४८ वीजग्राहकांनी १ लाख ९६ हजार रुपये वीज बिलापोटी थकविले आहेत.
कणकवली तालुक्यात १२0 ग्राहकांनी २७ लाख ९८ हजार, मालवण तालुक्यात ५७ ग्राहकांनी १ लाख ६३ हजार, वैभववाडी तालुक्यात ८७ ग्राहकांनी ५ लाख ४७ हजार, तर आचरा उपविभागात ७६ ग्राहकांनी २ लाख ३३ हजार रुपये थकविले आहेत. वीज बिल थकविणारे पाणीपुरवठादार एकूण ३८८ असून त्यांची एकूण ३९ लाख ३६ हजारांची वीज बिले थकीत आहेत. पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांमध्ये थकबाकीत कणकवली आघाडीवर आहे.
औद्योगिकीकरणातही थकबाकी
४घरगुती, कमर्शियल व्यापारी यांच्याबरोबर औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या थकबाकीदारांमध्ये देवगड तालुक्यात ९२ वीज ग्राहकांनी २ लाख ४७ हजार रुपये वीज बिलापोटी थकविले आहेत. कणकवली तालुक्यात २३५ ग्राहकांनी ६ लाख १८ हजार, मालवण तालुक्यात ५७ ग्राहकांनी १ लाख ७८ हजार, वैभववाडी तालुक्यात ६२ ग्राहकांनी २ लाख ३१ हजार, तर आचरा उपविभागात ६६ ग्राहकांनी १३ लाख १२ हजार रुपये थकविले आहेत.
वीज बिल थकविणारे एकूण ५१२ औद्योगिक ग्राहक असून त्यांनी एकूण २५ लाख ८७ हजार वीज बिल थकविले आहे. औद्योगिक व्यापाऱ्यांमध्ये थकबाकीत आचरा विभाग आघाडीवर आहे. आचरा विभागात मोठ्या संख्येने औद्योगिक थकबाकी असल्याने वीज कंपनीने ही थकबाकी वसुलीसाठी स्वतंत्र मोहीम राबविणे आवश्यक बनले आहे.
शेती पंपवाल्यांची थकबाकी
घरगुती, कमर्शियल व्यापारी, उद्योजक यांच्याबरोबर शेती पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांनीही वीज कंपनीला थकविले आहे. थकबाकीदारांमध्ये देवगड तालुक्यात १ हजार ८१ वीजग्राहकांनी ४ लाख ४१ हजार रुपये वीज बिलापोटी थकविले आहेत.
कणकवली तालुक्यात ७१८ ग्राहकांनी ९ लाख ८९ हजार, मालवण तालुक्यात २८0 ग्राहकांनी १ लाख २८ हजार, वैभववाडी तालुक्यात १८७ ग्राहकांनी ५ लाख ९८ हजार, तर आचरा उपविभागात ४७८ ग्राहकांनी ३ लाख ४८ हजार रुपये थकविले आहेत. वीज बिल थकविणारे एकूण २ हजार ७४४ शेतकरी असून त्यांनी एकूण २५ लाख ४ हजार वीज बिल थकविले आहे. शेतकऱ्यांमध्ये थकबाकीत कणकवली तालुका आघाडीवर आहे.
व्यावसायिक थकबाकीत कणकवली आघाडीवर
वीज कंपनीला घरगुती वीज ग्राहकांनी वीज बिलापोटी रक्कम न भरल्याने ते थकबाकीदार आहेत. त्याहीपेक्षा व्यावसायिकांनी म्हणजेच व्यापाऱ्यांचीही थकबाकी मोठ्या प्रमाणावर आहे. कणकवली विभागातील देवगड तालुक्यात ४४0 वीज ग्राहकांनी ९ लाख ९५ हजार रुपये वीज बिलापोटी थकविले आहेत. कणकवली तालुक्यात ७९५ ग्राहकांनी २१ लाख २५ हजार, मालवण तालुक्यात ४३६ ग्राहकांनी ९ लाख ८७ हजार, वैभववाडी तालुक्यात २८८ ग्राहकांनी ६ लाख ४0 हजार, तर आचरा उपविभागात १९९ ग्राहकांनी ३ लाख ११ हजार रुपये थकविले आहेत. वीज बिल थकविणारे २ हजार १५८ ग्राहक असून त्यांनी एकूण ५0 लाख ५७ हजार वीज बिल थकविले आहे. व्यावसायिक थकबाकीमध्ये २१ लाख २५ हजारांसह कणकवली तालुकाच आघाडीवर आहे.