सुरंगी विक्रेत्यांनाही फटका
By admin | Published: March 22, 2015 11:28 PM2015-03-22T23:28:57+5:302015-03-23T00:34:02+5:30
मजुरीपेक्षा दर मिळतोय कमी : बदलत्या वातावरणामुळे उत्पादनात घट
बाळकृष्ण सातार्डेकर --रेडी परिसरात सुरंगकळीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु यावर्षीच्या हंगामामध्ये वातावरणातील बदल, अवकाळी पावसामुळे उत्पादनात आलेली घट आणि फुलांवर किडीचा होत असलेला प्रादुर्भाव यामुळे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. सध्या बाजारपेठेत गतवर्षीपेक्षा काही प्रमाणात चांगला भाव मिळत असला, तरी सुरंगी कळी जमविण्यासाठी व सुकविण्यासाठी लागणारा कालावधी, या कामातील मजुरी आदी खर्चाच्या तुलनेत हा भाव कमी असल्याने या व्यवसायातील व्यापारी, रोजंदारीवर काम करणारा मजूर वर्ग, सर्वसामान्य बागायतदार आणि विक्रेत्या महिला वर्गातून चिंतेचे सूर उमटत आहेत.
साधारण मार्च व एप्रिल महिन्यांच्या कालावधीत सुरंगकळी व फुलांचे उत्पादन मिळते. कळी व फुलांवर सुकविण्याची प्रक्रिया करून येथील बाजारपेठेत विक्री केली जाते. त्यामुळे या हंगामाची आतुरतेने वाट पाहिली जाते. यावर्षी सुरंगकळीचे उत्पादन फारच कमी असले, तरी बाजारपेठेत अधिक भाव मिळण्याच्या आशेवर रेडी पंचक्रोशी परिसरात हे उत्पादन काढून ताब्यात घेण्यासाठी खटाटोप सुरू आहेत.
सुरंगकळीचा भाव वधारला असला, तरी हे काम जोखमीचे असल्याने रेडीसारख्या औद्योगिक गावात या कामासाठी मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. यावर पर्याय म्हणून रेडी परिसरातील ग्रामस्थ आणि विशेष करून महिला वर्ग सकाळपासूनच सुरंग फुले मिळविण्यासाठी कामास लागत आहेत.
महिला वगाकडून सुरंगीच्या फुलापासून आकर्षक हार (वळेसार) बनवून शिरोडा, आरोंदा येथील बाजारपेठेत विक्रीसाठी आणला जातो. सुरंगफुलाचे गजरे बाजारात २० ते २५ रुपये किमतीने विकले जातात. तर कळी काढणारे मजूर ४०० रुपयांपर्यंत रोजंदारीवर काम करीत आहेत.
सुरंगीच्या झाडाखाली गोणपाट, साड्या, चादर, सतरंजी, प्लास्टिक ताडपत्री पसरून झाडावरील सुरंगकळी व फुले पाडली जातात. ती उन्हात किमान तीन वेळा वाळवून विक्री केली जाते. सुरंगकळी विकण्याचा व्यवसाय मार्च ते एप्रिल असे दोन महिने चालतो.
सुरंगकळी व फुलांच्या वाढत्या मागणीमुळे या व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आता बदलू लागला आहे. पूर्वी कवडीमोलाने विक्री होणाऱ्या सुरंगकळीला आता चांगला भाव मिळत असल्याने रेडी पंचक्रोशीतील शेतकरी, बागायतदार, व्यावसायिक आपल्या परिसरातील सुरंगकळी वाया न घालविता जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. चांगला दर मिळत असल्याने या व्यवसायाकडे रोजगाराचे साधन म्हणूनही पाहिले जात आहे.
बहुपयोगी सुरंगकळी
सुरंगकळीचा उपयोग सुवासिक तेल, अगरबत्ती, उत्तम प्रतीचे अत्तर, सुगंधी साबण, जेल, रंग बनविण्यासाठी केला जातो. त्यामुळे सुरंगकळीला देश आणि परदेशातही मोठी मागणी आहे. सध्या बाजारात सुरंगकळी प्रतिकिलो २४० रुपये व वाळविलेले फू ल १५० रुपये किलोने खरेदी केले जात आहे. रेडी, शिरोडा, आसोली, वेळागर, आरवली-टांक, सोन्सूरे, मोचेमाड, न्हैचिआड, धाकोरे, आरोंदा, अणसूर, दाभोली, खानोली, तळवणे, आजगाव, मळेवाड या भागातील लोक मोठ्या प्रमाणात सुरंगकळीचे उत्पादन घेत आहेत. परंतु यावर्षी अवकाळी पाऊस पडल्याने उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे
महिला वर्गाकडून सुरंगीच्या फुलांपासून उत्कृष्ट हार, वळेसार बनवून विक्रीसाठी शिरोडा, आरोंदा बाजारात आणले जातात. तसेच गावातील देवतांच्या पाषाणमूर्तींना सुरंगीच्या हारांनी सजविण्यात येते. कोकणचा तिरुपती म्हणून ख्याती असलेल्या आरवली येथील श्री देव वेतोबाची सुरंगीच्या हारांनी पूजा केली जाते. त्यामुळे या भागात सुरंगीच्या हारांना मोठी मागणी आहे.
अवकाळी पडलेला पाऊस, कळ्या-फुलांवर किडीचा प्रादुर्भाव अशा कारणांमुळे उत्पादनात कमालीची घट झाली आहे. तसेच मिळणारा बाजारभाव मेहनत आणि खर्चाच्या तुलनेत फारच कमी असल्याने याचा फटका व्यावसायिकांना बसत आहे. त्यामुळे सुरंगकळी व वाळविलेल्या फुलाला येथे योग्य बाजारभावाची बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी.