मालवणमध्ये पर्यटन बहरले, समुद्र किनाऱ्याना सर्वाधिक पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 11:55 AM2017-10-23T11:55:27+5:302017-10-23T11:59:53+5:30
पर्यटन हंगाम १ सप्टेंबरपासून सुरू झाला असला तरी खऱ्या अर्थाने दिवाळीपासूनच पर्यटन हंगामाला दमदार सुरुवात होते. दिवाळीच्या सुटीमुळे देशी-विदेशी पर्यटकांनी मालवणला सर्वाधिक पसंती दिली आहे.
मालवण, दि. २३ : पर्यटन हंगाम १ सप्टेंबरपासून सुरू झाला असला तरी खऱ्या अर्थाने दिवाळीपासूनच पर्यटन हंगामाला दमदार सुरुवात होते. दिवाळीच्या सुटीमुळे देशी-विदेशी पर्यटकांनी मालवणला सर्वाधिक पसंती दिली आहे.
दीपावलीच्या पूर्वसंध्येपासून २९ आॅक्टोबरपर्यंत मालवणात पर्यटकांचा ओढा असणार आहे. शहरासह तारकर्ली, देवबाग, आचरा, तोंडवळी आदी किनारे पर्यटकांनी बहरून गेले आहेत.
पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्ग दर्शन, स्कुबा डायव्हिंग तसेच जलक्रीडा प्रकारांना पसंती दिली आहे. पर्यटन हंगाम बहरात येत असल्याने येथील हॉटेल व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
दिवाळीपासून गेले चार दिवस पर्यटकांनी मोठ्या संख्येने पर्यटन स्थळांना भेटी दिल्या आहेत. किल्ला दर्शन व स्कुबा डायव्हिंग करण्यावर पर्यटकांचा भर असल्याचे पर्यटन व्यावसायिकांनी सांगितले.
तारकर्ली येथील एमटीडीसीची निवासव्यवस्था २९ आॅक्टोबरपर्यंत आगाऊ बुकिंग केल्याने फुल्ल असल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले.
पर्यटकांनी समुद्रस्नान करताना आपल्या जीवाची काळजी घ्यावी. समुद्राच्या पाण्याशी अतिउत्साहीपणा करू नये, असे आवाहनही नागरिकांच्यावतीने करण्यात आले.