सीआरझेडबाबतच्या जमिनीचे सर्व्हे नंबर जाहीर करणार- उदय चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 10:16 PM2017-09-07T22:16:18+5:302017-09-07T22:17:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंधुदुर्गनगरी : मालवण व आचरा परिसरातील ज्या जमिनी सी व्ही सी ए (क्रिटीकली व्हलनरेबल सीआरझेड एरिया)मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत, त्या जमिनींचे सर्व्हे नंबर येत्या दोन दिवसांत वेबसाईटद्वारा जाहीर केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावर ५ आॅक्टोबरपर्यंत हरकतीही मागविण्यात येणार आहेत.
सागरी अधिनियमन क्षेत्र २०११ च्या परिपत्रकानुसार मालवण व आचरा या परिसरातील सीआरझेड अंतर्गत येणारे नकाशे जाहीर करण्यात आले होते. त्यावर नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्याचबरोबर सागरी अधिनियम संवेदनक्षम क्षेत्रात येणाºया जमिनींचे सर्व्हे नंबर येत्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार आहेत. यामध्ये सीआरझेड १ अ नकाशात येणाºया जमिनींचा समावेश आहे. यामध्ये कांदळवन जंगल, कांदळवनसदृश जमिनी, खाडीलगतच्या पाणथळ जमिनी, जेथे पक्षी घरटी बांधतात अशी ठिकाणे, भरती सुकतीमधील ठिकाणे, अशी जैव विविधता टिकण्यासाठी आवश्यक असलेली विविध संवेदनक्षम ठिकाणे यांचा समावेश आहे.
सागरी अधिनियमात यापूर्वी मालवण, आचरा व रत्नागिरी यांचा सरसकट समावेश होता. मात्र, आता जिल्हाधिकाºयांकडून वरीलप्रमाणे ठिकाणे केवळ सागरी अधिनियमासाठी निश्चित करण्यात येणार आहेत.त्यामुळे जैवविविधतेसाठी व ती टिकण्यासाठी एक आराखडा बनविता येईल. तसेच सरसकट जो भाग सागरी अधिनियमात येत होता, तो न येता प्रत्यक्षात संवेदनक्षम असलेल्या भागाचाच समावेश यात होईल. असे किती क्षेत्र आहे याची परिपूर्ण माहिती येत्या दोन दिवसांत सर्व्हे नंबरसह जाहीर करण्यात येईल. त्यानंतर त्यावर ५ आॅक्टोबरपर्यंत हरकती मागवून हे क्षेत्र निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.