वैभव नाईक मला लहान भावाप्रमाणे.. :.दीपक केसरकर
By admin | Published: December 8, 2014 08:57 PM2014-12-08T20:57:27+5:302014-12-09T00:55:24+5:30
वैभव नाईक यांचा कुडाळमध्ये सत्कार
कुडाळ : शिवसैनिकांनी माझ्यासारख्या सामान्य माणसाला आमदार बनवून धनशक्तीचा पराभव केला. हे ऋण मी कधीही विसरणार नाही, असे वक्तव्य आमदार वैभव नाईक यांनी केले. वैभव नाईक यांचे नेतृत्व मोठे करण्याचे काम आपण करणार असल्याचे वक्तव्य ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी कुडाळ येथील शिवसेनेच्या मासिक सभेदरम्यान केलेल्या सत्कार समारंभप्रसंगी केले.
कुडाळ तालुका शिवसेनेची मासिक सभा आज, सोमवारी अनंत मुक्ताई सभागृहात संपन्न झाली. या सभेला आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब, महिला उपजिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय भोगटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमाकांत ताम्हाणेकर, जान्हवी सावंत, पंचायत समितीचे सदस्य बबन बोभाटे, गंगाराम सडवेलकर, दीपिका कदम, दीपश्री नेरूरकर, अनुप्रिती खोचरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार वैभव नाईक यांचा आंब्रड येथील ज्येष्ठ शिवसैनिक दिनकर परब यांच्या हस्ते, तर राज्यमंत्री दीपक केसरकर यांचा तुळसुली येथील ज्येष्ठ शिवसैनिक दाजी वारंग यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच भारती विद्यापीठ पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या चौथीसाठी ‘गणित परिचय’ परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या कुडाळ येथील निकिता विजय प्रभूतेंडोलकर या विद्यार्थिनीचा आमदार नाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. (प्रतिनिधी)
ुकृषी पर्यटनातून रोजगार : केसरकर
यावेळी बोलताना मंत्री केसरकर म्हणाले, कुडाळ येथील एमआयडीसीमध्ये नवीन उद्योगधंदे आणण्यासाठी प्रयत्नशील राहू. तसेच येथील सुरू असलेले उद्योगात प्रगती होण्यासाठीही प्रयत्न केले जातील. कृषी पर्यटनातून रोजगार निर्मिती होण्यासाठी विशेष लक्ष देणार आहोत. आमदार नाईक मला लहान भावाप्रमाणे असून, त्यांचे नेतृत्व मोठे करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन, असे सांगितले.
आगामी निवडणुका
महत्त्वाच्या : शिरसाट
लोकसभा व विधानसभेत मिळालेले यश महत्त्वाचे असले, तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा बँक व इतर निवडणुकांमध्ये यश मिळविण्यासाठीही प्रयत्नरत राहिले पाहिजे. त्यासाठी आतापासून कामाला लागणे गरजेचे आहे, असे उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट यांनी सांगितले.
आमदार नाईक यांनी, धनशक्तीच्या पराभवासाठी रक्ताचे पाणी केलेल्या शिवसैनिकांचे ऋण मी कधीही विसरणार नाही, असे सांगितले. तसेच जिल्हा रुग्णालयात सर्वसामान्यांना योग्य आणि तातडीची सेवा मिळण्यासाठी शिवसेनेच्यावतीने एक शिवसैनिक ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी अन्य पदाधिकाऱ्यांनीही मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.