वेंगुर्ले किनारपट्टी काळ्या डागांनी व्यापली

By Admin | Published: May 26, 2016 11:48 PM2016-05-26T23:48:30+5:302016-05-27T00:02:22+5:30

तेलकट काळ्या गोळ्यांचा खच : पर्यटकांची पाठ, प्रशासनाचे दुर्लक्ष, स्थानिकांतून संताप--लोकमत विशेष

The Vengurle coastline covered the black spot | वेंगुर्ले किनारपट्टी काळ्या डागांनी व्यापली

वेंगुर्ले किनारपट्टी काळ्या डागांनी व्यापली

googlenewsNext

सावळाराम भराडकर ---वेंगुर्ले  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निळाशार पाण्यापने व शुभ्र वाळूने बहरलेल्या समुद्र किनाऱ्यांची सर्वांनाच भुरळ पडली आहे. या आकर्षनाने पर्यटकांना वेड लावले असून वर्षभर पर्यटकांचा ओढा या किनारपट्टीवर कायम राहतो. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनला या किनारपट्टींनी बळ मिळाले आहे. पण सद्या वेंगुर्ले-फळयेकोंडा, वायंगणी, कोंडूरांसह तालुक्यातील सर्वच समुद्र किनाऱ्यावरील वाळूवर काळ्या व तेलकाट गोळ्यांचा तवंग पसरला आहे. वाळूच्या पांढऱ्या शुभ्र किनाऱ्यावर आणि निळाशार पाण्यावर अशा काळ्याकुट्ट डागांनी किनारपट्टी अस्वच्छ झाली असून पर्यटकांना ती मारक ठरत आहे.
परिणामी पर्यटनास आळा बसण्याचा धोका संभवतो आहे. तर दरवर्षी सागर किनारे स्वच्छ करण्याचे आराखडे आखणाऱ्या प्रशासनाने असे तवंग होण्याचे गुपित ओळखून संबंधितांवर कडक कारवाई करण्यास मात्र कायमच टाळाटाळ केली आहे. त्यामुळे अशा प्रकाराने वेंगुर्लेतील किनारपट्टीवरील पर्यटनास धोका संभवतो आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा हा तसा पहिल्यापासून पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण शासनाने तो अधिकृत घोषित केल्यावर येथील पर्यटनास खऱ्याअर्थाने चालना मिळाली. जिल्ह्यातील नयनरम्य सागर किनारे, निळेशार स्वच्छ पाणी आणि त्याचबरोबर पांढऱ्या शुभ्र वाळूचा पसरलेला थर पर्यटकांना भुरळ घालत राज्यासह देशातील पर्यटकांना आपल्याकडे ओढण्यास कारणीभुत ठरला. सिंधुदूर्ग जिल्ह्याला लाभलेले किनारपट्टीचे वरदानाने वर्षभर पर्यटकांचा लोंढा जिल्हयात आकर्षीत झाला आहे. यामुळे स्थानिकांना व्यापार, व्यवसायासाठी संजीवनी ठरली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थिक विकासाचा कणा म्हणून या किनारपट्टीकडे पाहिले जाते.
शिवाय निसर्गरम्य ठिकाणे आणि मोजके पर्यटक यांमुळे जिल्ह्याच्या सर्वच किनाऱ्यांवर आता विदेशी पर्यटकही आपली हजेरी लावत आहेत. साहजिकच यामुुळे दिवसेंदिवस देशी-विदेशी पर्यटकांची संख्या वाढत आहे. तर वर्षातील मे व दिवाळी अशा दोन मुख्य सुट्यांमध्येही पर्यटकांचा ओढा मोठ्या संख्येने राहतो.
सद्या मे महिन्यात शाळांना सुट्ट्या असल्याने कुटुंबासह मुंबईकरही पर्यटनासाठी मोठ्या संख्येने गावी आले आहेत. किनाऱ्यावरील पर्यटकांची संख्या वाढल्याने वेंगुर्लेतील सागरी किनारे पर्यटकांनी सजले आहेत. मात्र, योगायोगाने याच महिन्यात वेंगुर्लेतील बहुतांशी किनारपट्टीवर तेल तवंगाचे लहान-मोठे गोळे इतस्तत: पडलेले आहेत. शिवाय हे गोळे चिकटमय असून ते मेणाप्रमाणे मऊ आहेत. कडाकाच्या उन्हाने उन्हामुळे वितळून येथील शुभ्र वाळूवर पडल्याने किनारपट्टी काळीकुट्ट बनत आहे. तसेच पर्यटकांच्या किनारपट्टीवर चालताना ती पायाला चिकटत आहे. तेलकट गोळे एकदा पायाला किंवा चपलाला चिकटले तर बऱ्याच प्रयत्नांनी ती निघता निघत नाही. समुद्र किनाऱ्यावरील मुलांनाही ते अपायकारक ठरत आहे.
वेंगुर्ले तालुक्याचा विचार करताना निसर्गाने मुक्त हस्ताने निसर्गरम्य अशा सागरी किनारपट्टीची मुक्त हस्ताने उधळण केली आहे. मात्र, मानवनिर्मित या तेलतवंगाचा फटका पर्यटनप्रेमींबरोबरच येथील स्थानिकांना बसत आहे. याची दखल घेऊन किनारे स्वच्छ करण्याचे आराखडे प्रशासकीय अधिकारी आखतात व ते कितपत कृतीत आणतात हा संशोधनाचाच विषय आहे. मात्र, हे कशाने घडते याची साधी शहानिशाही होत नाही.

कारण अस्पष्ट : यंत्रणाही ठप्पच
सागरी मार्गे मोठ्या प्रमाणात तेल इंधनची वाहतूक होत असते. बऱ्याचवेळा अशी वाहतूक होताना मोठ्या प्रमाणावर तेल गळती होते. तर काहीवेळा तेलाची वाहतूक होताना जहाजांना जलसमाधीही पण मिळते. कदाचित याहीमुळे असे तवंग निर्माण होऊ शकतात. तरे मे महिन्यात जिल्ह्यात समुद्रात मासेमारी करणे बंदीचे असते. अशावेळी सर्वच मच्छिमार आपल्या नौका, जहाज व तत्सम साधनांची समुद्रात साफसफाई करून आतील सर्वच घाण समुद्रात फेकतात. कदाचित यामुळेही असे तेल-तवंगांचे गोळे तयार होऊन ते समुद्राच्या लाटेने किनारपट्टीवर पसरत असतील. गोवा, केरळ, आंध्र तसेच सिंधुदुर्गातील मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. त्यामुळे साहजीकच मे महिन्याच्या याच काळात डागडुजी व देखभालीसाठी नौकांची इंजिनाबरोबरच इतरही वस्तूंची ‘आॅईल’ने साफसफाई केली. कदाचित याच प्रकारामुळे अतिरिक्त तेलामुळेच किनारपट्टीवर तेलाचे गोळेवजा तवंग जमा होऊन किनारपट्टी काळीकुट्ट बनत आहे. पण खरे काय हे पाहण्यास प्रशासन साधी तसदीही घेत नाही. परिणामी या तेल-तवंगाचा समुद्रातील जीवांना तर धोका आहेच पण त्याचबरोबर पर्यटकांना आणि पर्यटन व्यवसायालाही आहे.

बहुतांशी किनारपट्टीवर प्रादुर्भाव
कोंडुरा, वायंगणी, वेंगुर्ले, रेडी, शिरोडा, वेळागर, फळयेफोंडा, केळूस, खवणे, कर्ली अशा सर्वच किनारपट्टीवर तेलवजा तवंग काळे गोळे जमा झाले असून, स्थानिक मच्छिमारांसाठी अपायकारक ठरत आहेत. त्यामुळे या विषयात प्रशासनाने लक्ष घालून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.


प्रशासनाचे जाणिवपूर्व दुर्लक्ष
समुद्र किनाऱ्यावरील देखरेख करणाऱ्या संबंधित कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळेच अशा घटना वर्षानुवर्षे होत आहेत.
तेलगोळे जमा होण्याचे प्रकार दरवर्षी होतात. शासन कृती कार्यक्रम हाती घेतात.
मात्र, संबंधित कारवाईपासून वंचित राहतात. त्यामुळे असे प्रकार थांबत नाहीत.

विदेशी पर्यटकाकडून निषेध
समुद्र किनाऱ्यावरील स्वच्छता हा शहराच्यादृष्टीने महत्वाचा भाग आहे. तसेच समुद्रातील जीवसंपत्तीसाठी फार महत्वाचा आहे.
वेंगुर्ले किनारपट्टीवरील या प्रदुषणाने एका विदेशी पर्यटकाने शहरातील दिपगृहावरच वीस तास ठाण मांडून आगळा-वेगळा निषेध केला, तोही या स्वच्छतेसाठीच. प्रशासनाने याचे गांभीर्य वेळीच ओळखावे.

Web Title: The Vengurle coastline covered the black spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.