फटाके उडवल्याप्रकरणी सोलापुरात १३६ जणांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 02:56 PM2018-11-09T14:56:35+5:302018-11-09T15:00:06+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघटन; सोलापूर शहर पोलीसांची कारवाई
सोलापूर : दिवाळीनिमित्त पाडव्याचे औचित्य साधून शहरात पहाटे चार वाजल्यापासून उडवण्यात आलेल्या फटक्याप्रकरणी शहरातील सात पोलीस ठाण्यामध्ये १३६ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फटाके उडविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने रात्री ८ ते १० हा कालावधी दिला होता. न्यायालयाच्या आदेशामुळे शहरात फटाके उडवले जाणार नाहीत याची दक्षता पोलीस विभागाकडून घेण्यात आली होती. लक्ष्मीपूजनादिवशी रात्री आठ ते दहा या वेळेतच शहरांमध्ये फटाके उडवण्यात आले होते. पाडव्याच्या पूजेनिमित्त शहरातील व्यापारी व नागरिकांनी गुरुवारी पहाटे पासूनच फटाके उडवण्यास सुरुवात केली. फटाक्याचा आवाज ऐकून पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी पहाटे पाच वाजता गुन्हे शाखेच्या पोलिसांना फटाके उडवणाºयांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी फटाके उडविणाºयांना ताब्यात घेतले. फौजदार चावडी पोलीस ठाणे, जेलरोड पोलिस ठाणे, सदर बाजार पोलीस स्टेशन, विजापूर नाका पोलीस स्टेशन, सलगरवस्ती पोलिस स्टेशन, जोडभावी पेठ पोलीस स्टेशन, एमआयडीसी पोलीस स्टेशन या सात पोलिस स्टेशन मधील पोलिसांनीही आपापल्या हद्दीमध्ये फिरून फटाके उडविणाºया नागरिकांना ताब्यात घेतले.