सोलापूर जिल्ह्यात कृषीपंपाची तब्बल ४२४ कोटींची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 03:23 PM2017-11-02T15:23:40+5:302017-11-02T15:25:09+5:30
सोलापूर जिल्ह्यातील ३ लाख ४४ हजार ४७० थकबाकीदार ग्राहकांपैकी ६४ हजार ५३१ कृषिपंप ग्राहकांनी नवीन वीजजोडणी घेतल्यापासून एकही बिल भरलेले नाही. त्यांच्याकडे ४२४ कोटी २८ लाख रुपये थकबाकी आहे
आप्पासाहेब पाटील
सोलापूर दि २ : सोलापूर जिल्ह्यातील ३ लाख ४४ हजार ४७० थकबाकीदार ग्राहकांपैकी ६४ हजार ५३१ कृषिपंप ग्राहकांनी नवीन वीजजोडणी घेतल्यापासून एकही बिल भरलेले नाही. त्यांच्याकडे ४२४ कोटी २८ लाख रुपये थकबाकी आहे. थकबाकीदार शेतकºयांना दिलासा देण्यासाठी 'मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना - २०१७' जाहीर करण्यात आली आहे. याचा कृषिपंप लाभ घेण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
अनेकदा आवाहन करूनही कृषिपंप वीजग्राहक वीजबिल भरत नसल्याने बारामती मंडलाची थकबाकी दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यातील ३ लाख ४४ हजार ४७० कृषिपंप ग्राहकांकडे २ हजार ३७० कोटी ५१ लाख रुपये थकबाकी आहे. आधीच महावितरण आर्थिक संकटात सापडली आहे. महावितरणची थकबाकी अशीच वाढत राहिली तर त्याचा वीजवितरण सेवेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे महावितरणला नाइलाजास्तव वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घ्यावी लागते.
सोलापूर जिल्ह्यातील एकदाही वीजबिल न भरणाºया कृषिपंप ग्राहकांमध्ये माळशिरस तालुक्यातील ५ हजार ८५० ग्राहकांकडे ३६ कोटी ४८ लाख, बार्शी तालुक्यातील ७ हजार ३४८ ग्राहकांकडे ५० कोटी २७ लाख, करमाळा तालुक्यातील ७ हजार ५०७ ग्राहकांकडे ६५ कोटी ९ लाख, माढा तालुक्यातील ११ हजार ४६७ ग्राहकांकडे ८६ कोटी १९ लाख, मंगळवेढा तालुक्यातील ४ हजार २२८ ग्राहकांकडे १६ कोटी ९४ लाख, पंढरपूर तालुक्यातील ६ हजार ६१४ ग्राहकांकडे ४१ कोटी ९८ लाख, सांगोला तालुक्यातील ४ हजार ६८५ ग्राहकांकडे २२ कोटी ४७ लाख, अक्कलकोट तालुक्यातील ३ हजार ८१२ ग्राहकांकडे २५ कोटी ५४ लाख, मोहोळ तालुक्यातील ६ हजार ७०१ ग्राहकांकडे ४६ कोटी १२ लाख, उत्तर सोलापूर तालुक्यातील १ हजार ९७५ ग्राहकांकडे ९ कोटी ७२ लाख तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील ४ हजार ३४४ ग्राहकांकडे २३ कोटी ४८ लाख रुपये थकबाकी आहे.
--------------------------------
तीन वर्षांत ७ हजारांहून अधिक जोडण्या
मागील तीन वर्षांचा विचार केला तर सोलापूर जिल्ह्यात महावितरणच्या वतीने कृषिपंपांना विक्रमी वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये २०१५-१६ या आर्थिक वर्षात ५ हजार ८९४ नवीन कृषिपंप जोडण्या देण्यात आल्या. २०१६-१७ या आर्थिक वर्षात १ हजार ४९ तर २०१७-१८ या चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ७७५ कृषिपंपांना वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.