ऑनर किलिंग प्रकरणातील अनुराधाच्या पतीचाही संशयास्पद मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 04:22 PM2018-12-09T16:22:42+5:302018-12-09T16:25:22+5:30
राज्यभर गाजलेल्या मंगळवेढा तालुक्यातील सलगर येथील डॉ अनुराधा बिराजदारच्या ऑनर किलिंग प्रकरणातील डॉ. अनुराधाचा पती श्रीशैल बिरादार याचा मृतदेह आढळून आला आहे.
सोलापूर - राज्यभर गाजलेल्या मंगळवेढा तालुक्यातील सलगर येथील डॉ अनुराधा बिराजदारच्या ऑनर किलिंग प्रकरणातील डॉ. अनुराधाचा पती श्रीशैल बिरादार याचा मृतदेह आढळून आला आहे. विशेष म्हणजे जिथे डॉक्टर अनुराधाचा मृत्यू झाला त्याचठिकाणापासून २० फूट अंतरावर पती श्रीशैल्य बिरादारचाही मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनास्थळी श्वान पथक मागविण्यात आले आहे
सलगर ( ता. मंगळवेढा ) येथील डॉ. अनुराधा बिराजदार ही कर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेत होती. तिने आपल्या कुटुंबातील शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या श्रीशैल बिरादार याच्याशी विजापूर येथे नोंदणी विवाह पध्दतीने प्रेमविवाह केला होता. सालगड्याच्या मुलाबरोबर लग्न केल्याचा राग मनात धरून अनुराधाला सलगर येथे ४ ऑक्टोबर रोजी रात्री आपल्या शेतात आणून वडिल विठ्ठल बिराजदार व सावत्र आई श्रीदेवी या दोघांनी तिला विषारी औषध पाजून ठार मारले होते. याप्रकरणी पोलिसांनी वडील विठ्ठल व आई श्रीदेवी बिराजदार यांना अटक केली आहे.
डॉ. अनुराधा बिराजदार हिच्या खूनात समाविष्ट असणाऱ्या सर्व मारेकऱ्यांना अटक करून कठोर शिक्षा व्हावी अन्यथा आत्महत्या करणार असल्याचा इशारा अनुराधाचा पती श्रीशैल बिराजदार यांनी काही दिवसांपूर्वीच लेखी निवेदनावर दिला होता. या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी जिथे अनुराधा बिराजदार हिच्यावर अंत्यसंस्कार झाले त्याच ठिकाणी तिचा हात पती श्रीशैल्यचा मृतदेह आढळून आला आहे.
आपल्या जीवाला धोका असल्याची शंका उपस्थित करणाऱ्या श्रीशैल्यने आत्महत्या केली की त्याचीही हत्या झाली याबाबत आता उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. ही आत्महत्या की हत्या याबाबतचा खुलासा अद्याप झाला नाही. घटनास्थळी मंगळवेढा पोलिस आले असून श्वानपथक पाचारण करण्यात आले आहेत.