गावात स्मशानभूमी नसल्याने १५ किमी पायपीट करून दुसऱ्या गावात अंत्यसंस्कार
By दिपक दुपारगुडे | Published: July 1, 2023 06:54 PM2023-07-01T18:54:54+5:302023-07-01T18:55:30+5:30
नुकतेच माळशिरस येथील पैलवान कुटुंबातील शारदाबाई शिवाप्पा पैलवान वय ९४ यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी माळशिरस येथे निधन झाले.
दीपक दुपारगुडे
सोलापूर : माळशिरस येथे लिंगायत समाजाची स्वतंत्र्य स्मशानभूमी नसून नागरपंचायतीने नियोजित लिंगायत समाज स्मशान भुमीवर सांडपाणी शुध्दीकरणाचा प्रकल्प सुरु केल्यामुळे लिंगायत समाजाची स्मशानभुमी नसल्याने समाजातील मृतावर १५ किमी लांब अकलूज लिंगायत स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करावे लागतात.
नुकतेच माळशिरस येथील पैलवान कुटुंबातील शारदाबाई शिवाप्पा पैलवान वय ९४ यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी माळशिरस येथे निधन झाले. अंत्यसंस्कार करण्यास स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधी करण्यासाठी १५ कि.मी.अंतर असलेल्या अकलूज शहरातील लिंगायत स्मशानभूमीत न्यावे लागल्याने गेल्या अनेक दिवसांपासून लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीची मागणी करणाऱ्या नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्वतंत्र स्मशानभूमीबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आला परंतु स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध होत नाही. तसेच अनेक निवडणुकीत वेगवेगळ्या गट व पक्षाच्या नेत्यांनी समाजाला स्मशानभूमीचे आश्वासन दिली होती. मात्र अद्याप त्याची पूर्तता झाली नसल्याने स्मशानातील अंत्यसंस्कार करण्यासाठी दुसऱ्या गावाच्या स्मशान भुमीत जावे लागल्याने मृत्यूनंतरच्या यातना समोर येताना दिसत आहेत.
लिंगायत समाज बांधवांनी यापूर्वी अनेकवेळा स्मशान बाबतीत पाठपुरावा केला आहे मात्र स्मशानभूमी उपलब्ध झाली नाही यापुढील काळात समाजातील व्यक्ती मयत झाल्यास तहसील कार्यालयासमोर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत याबाबत त्यांना पत्रव्यवहार करणार आहे. -शिवदास गुजरे, नागरिक माळशिरस