सोलापूर पोलीस अधिक्षकांच्या दालनासमोर तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 11:36 AM2018-08-07T11:36:53+5:302018-08-07T11:40:59+5:30
अंगावर रॉकेल ओतून घेतले : बार्शीत चौघांवर गुन्हा
सोलापूर : जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या दालनासमोर एका युवतीने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. दिवसाढवळ्या ही घडल्याने एकच खळबळ माजली आहे. त्यानंतर या प्रकरणी पिडित युवतीच्या फिर्यादीनुसार बार्शी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, विविध प्रशासकीय कार्यालये असल्याने नेहमीच या परिसरात वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. त्यातच या पसिरात मोठ्या प्रमाणात वर्दळ होती. अशावेळी अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हे वृत्त वाºयासारखे पसरले.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार पीडित युवतीने आपल्यावर अत्याचार झाल्याची तक्रार बार्शी पोलीस ठाण्यात दिली होती. एका विवाहित इसमाने पीडित युवतीला नोकरीचे आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. पीडितेने त्या इसमाला माझ्याशी लग्न कर, असे म्हटले असता तो नेहमी टाळाटाळ करीत होता. दोघांच्या संबंधातून पीडित तरुणी गर्भवती राहिली. या प्रकाराने संबंधित इसमाने हात वर करीत जातीवाचक शिवीगाळ करुन तो गर्भ माझा नाही, असे म्हणून गोळ्या खाऊन खाली करण्यास सांगितले. गर्भ खाली केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने पीडित युवतीला तिचा गर्भ खाली करण्यासाठी गोडावूनमध्ये नेऊन मारहाण करुन गोळ्या खाऊ घातल्या आणि तिचा गर्भपात केला. त्या बदल्यात तू पैसे घे म्हणून धमकावले, अशा आशयाची तक्रार बार्शी पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांची धावाधाव; आरोपींचा शोध सुरु
- पोलीस अधीक्षक कार्यालयात अचानक अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येच्या प्रकार घडल्याने पोलिसांची एकच धावपळ उडाली. तिला ताब्यात घऊन आत्महत्येपासून परावृत्त केले. नियंत्रण कक्षातील अधिकारी कदम यांनी तिचे गाºहाणे ऐकून पुढील कार्यवाहीसाठी तिला पोलिसांसमवेत बाशी पोलीस ठाण्याकडे नेले. तेथे तिच्या फिर्यादीनुसार कस्तुबा उर्फ अण्णा रमेश पेठकर, दादू रमेश पेठकर, शंभू शुंघे,अक्षय सिद्धेश्वर घेवारे या चौघांविरुद्ध गुन्हा नोंदला असून, संबंधित आरोपींचा शोध सुरु असलस्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी विजय कबाडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.