वकील दाम्पत्य हत्येच्या निषेधार्थ बार्शीत वकील संघांचे कामबंद आंदोलन
By काशिनाथ वाघमारे | Published: January 29, 2024 06:12 PM2024-01-29T18:12:12+5:302024-01-29T18:12:53+5:30
बार्शी वकील संघाने सोमवारी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला.
काशिनाथ वाघमारे, सोलापूर : नगर जिल्ह्यातील राहुरी न्यायालयात वकिली व्यावसाय करणारे राजाराम आढाव व त्यांची पत्नी मनीषा या दाम्पत्याचे अपहरण करून हत्या केल्याच्या निषेधार्थ बार्शी वकील संघाने सोमवारी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला.
बार्शी वकील संघाचे अध्यक्ष काका गुंड यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी कामबंद आंदोलन करण्यात आले. नगर जिल्ह्यातील आढाव दाम्पत्याची पक्षकाराने हत्या केल्याच्या निषेधार्थ व यापूर्वी वकिलांवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध म्हणून न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा ठराव केला. त्या घटनेची चौकशी सीआयडीमार्फत करण्यात यावी, हा खटला चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील नेमण्यात यावा व वकील सुरक्षा कायदा लवकरात लवकर लागू करण्यात यावा, या मागणीचे निवेदन निवासी तहसीलदार बदे व संजीवन मुंढे यांना देण्यात आले. निवेदन देताना वकील प्रोटेक्शन कायदा लागू झालाच पाहिजे, आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे , वकील एकजुटीचा विजय असो, अशा घोषणा देत निवेदन सादर केले.
यावेळी विकास जाधव, पद्माकर काटमोरे, महेश जगताप, संभाजी गलांडे, किशोर करडे, आर. यू. वैद्य, गणेश हांडे, श्याम झाल्टे, अविनाश गायकवाड, राजू शेख, राहुल झाल्टे, अक्षय पाटील, घोगरे, हांडे यांच्यासह वकील संघाच्या ५० सदस्यांच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन लक्ष वेधले.