सावधान ! पंढरपूरात डेंग्युसदृश परिस्थिती, १३,५०० घरातील पाण्याच्या साठ्यांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 04:32 PM2017-10-23T16:32:18+5:302017-10-23T16:35:35+5:30
पंढरपूर नगरपरिषदेतर्फे डेंग्यूसदृश साथीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पंढरपूर शहरात १७,५०० मालमत्ता व ५,००० झोपड्या आहेत. यापैकी १३,५०० घरांना समक्ष भेटी देऊन त्यांच्या घरातील पाण्याचे साठे तपासणी केली आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
पंढरपूर दि २३ : पंढरपूर शहरात डेंग्युसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे़ पंढरपूर नगरपरिषदेतर्फे डेंग्यूसदृश साथीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पंढरपूर शहरात १७,५०० मालमत्ता व ५,००० झोपड्या आहेत. यापैकी १३,५०० घरांना समक्ष भेटी देऊन त्यांच्या घरातील पाण्याचे साठे तपासणी केली आहे. यापैकी ९७६ घरांमध्ये साठविलेल्या पाण्यामध्ये डासअळ्या आढळून आल्या. या दूषित पाण्याच्या साठ्यामध्ये टेमिफॉसचे द्रावण टाकून डासअळ्या नष्ट करण्यात आल्या.
पंढरपूर शहरातील १३०८ डासोत्पत्ती स्थानावर हातपंप व ब्लोअरद्वारे डासअळी प्रतिबंधक फवारणी करण्याचे काम चालू आहे. फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी करण्यात येत आहे. शहरात ३७ ठिकाणी २१८ व ७६०० शौचालयामध्ये बीटीआय लिक्विड फवारणी करण्यात आली आहे. कंटेनर सर्व्हेच्या माध्यमातून ९६० टायर्स जप्त केले आहेत.
पंढरपूर शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून जिल्हा व स्थानिक वर्तमानपत्रातून डेंग्यू साथ नियंत्रणाअंतर्गत जाहीर आवाहन केले आहे. शहरातील स्थानिक केबल नेटवर्कव्दारे नागरिकांना डेंग्यू साथ प्रतिबंधात्मक उपाय योजनेबाबत आवाहन सुरू आहे. पंढरपूर शहरातील प्रमुख चौकाचा दर्शनी भाग, शाळा व महाविद्यालयांमध्ये आरोग्य व हिवताप विभागामार्फत २० डिजिटल बोर्ड लावण्यात आले आहेत. वर्तमानपत्रांमधून ५,००० व कंटेनर सर्वेक्षणावेळी १५,००० असे २०,००० जाहीर आवाहनाचे हॅन्डबिल वाटप करण्यात येत आहेत. डेंग्यूसदृश साथीवर प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी हाती घेण्यात आलेली विशेष मोहीम उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांच्या मार्गदर्शनाखाली, आरोग्याधिकारी डॉ. संग्राम गायकवाड, हिवताप पर्यवेक्षक डी. एफ. गजाकोश, आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, महादेव अदापुरे, बर्मा पवार, कुमार भोपळे हे यशस्वीपणे राबवित आहेत.
------------------
शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती
साथ नियंत्रणासाठी सुमारे ५० कर्मचाºयांद्वारे पंढरपूर शहरातील डेंग्यू साथ नियंत्रणासाठी कंटेनर सर्वेक्षणांतर्गत डासअळी आढळून आलेल्या पाणी साठ्यामध्ये टेमिफॉसचे द्रावण टाकणे, प्रत्येक घरामध्ये जाहीर आवाहनाचे हॅन्डबिल वाटप करणे, फॉगिंग मशीनने धूर फवारणी करणे, तात्पुरत्या स्वरुपातील डासोत्पत्ती स्थानांमध्ये व गटारीमध्ये डासअळी प्रतिबंधक औषध फवारणी करणे, डेंग्यू साथ प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
--------------------
नागरिकांनीही सहकार्य करावे
शहरातील नागरिकांनी साठा केलेले पाणी आठवड्यातून एक दिवस रिकामे करुन कोरडा दिवस पाळावा व आपल्या घरांमध्ये टेरेस-गच्चीवर साठलेले पावसाचे पाणी त्वरित काढून कोरडे करावे. जेणेकरुन डेंग्यूचा डास निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. डेंग्यूचा डास हा स्वच्छ पाण्यातच निर्माण होत असल्याने नागरिकांनी याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा साधना भोसले, मुख्याधिकारी अभिजित बापट, आरोग्य समिती सभापती भाग्यश्री शिंदे यांनी केले आहे.