मोठी बातमी; निरा नदीने पाण्याची पातळी ओलांडली; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2022 04:35 PM2022-08-09T16:35:12+5:302022-08-09T16:35:47+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
अकलूज : तीन आठवड्याच्या विश्रांतीनंतर निरा खो-यात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने वीर, भाटघर, निरा, देवघर व गुंजवणी या धरणातील पाण्याची पातळी वाढत असून आज मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास वीर धरणाचे गेट क्र.५ साडे चार फुट उचलून नीरा नदीत ४ हजार ६३७ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे, तर उजवा कालव्याच्या विद्युतगृहातुन ८०० क्युसेक व डाव्या कालवा विद्युतगृहातुन ३०० क्युसेस असे १ हजार १०० व धरणातून ४ ६३७ क्युसेक असा एकुण ५ हजार ७३७ क्युसेक इतका पाणी विसर्ग निरा नदीत सुरु झाल्याने वीर धरण प्रशासनाने निरा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
यंदाच्या पावसाळ्यात जुन व जुलै महिन्यातील पहीला आठवड्यापर्यत पावसाने दडी मारल्यानंतर गत महिन्यात निरा खो-यात ६ जुलैला पावसाला प्रारंभ झाला होता. निरा खो-यातील वीर, भाटघर, निरा-देवघर व गुंजवणी या चार धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत गेली. १५ जुलै रोजी वीर धरण ९२ टक्के भरल्यानंतर धरणातुन निरा नदीत टप्प्याने पाणी सोडण्यात आले होते, त्यानंतर १९ जुलैला पावसाचा जोर ओसरल्याने निरा नदीत पाणी सोडण्याचे बंद करण्यात आले होते. तब्बल तीन आठवडे पावसाने दडी मारल्यानंतर गत दोन दिवसापासून निरा खो-यात पावसाचे आगमन झाले असुन दोन दिवसाच्या पावसाने वीर, भाटघर, निरा-देवघर व गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या पाण्यामुळे चारही धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
वीर धरण ९७ टक्के भरले असल्यामुळे आज मंगळवारी वीर धरणातून ४ हजार ६३७ क्युसेक अधिक उजवा कालव्यातील विद्युतगृहातुन ८०० क्युसेक व डावा कालव्यातील विद्युतगृहातुन ३०० क्युसेक असा एकत्रित ५ हजार ७३७ क्युसेक पाण्याचा विसर्ग आज सकाळी ९ वाजता निरा नदीत सोडण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास पाण्याच्या विसर्गात वाढ केली जाणार असल्याचे वीर धरणाचे उप अभियंता नलावडे यांनी माहिती दिली.