राम मंदिराबाबत भाजपकडून फसवणूक : रामदास कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 05:05 PM2018-12-23T17:05:52+5:302018-12-23T17:08:29+5:30
कायदा करून राम मंदिर उभारता आले असते
पंढरपूर : गेल्या ३० वर्षांपासून निवडणूक आली की भाजपकडून राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला जातोय़ गत निवडणुकीत या मुद्यावर देशातील जनतेसह हिंदूत्वावादी संघटनांनी भाजपाला पूर्ण बहुमत देत सत्तेत पाठविले़ मात्र त्यानंतरही सरकारने राममंदिराबाबत ठोस पावले उचलली नाहीत़ कायदा करून राम मंदिर उभारता आले असते पण ते केले नाही़ आता निवडणुका येताच त्यांच्याकडून पुन्हा हा मुद्दा पुढे येऊ लागला आहे़ ही चुकीची बाब आहे़ आजपर्यंत त्यांनी याच मुद्दयावर देशाची फसवणूक केली आहे़ अशी टिका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली.
पंढरपूर येथे २४ डिसेंबर रोजी ‘पहिले मंदिर, फिर सरकार’चा नारा देत शिवसेनेने महासभेचे आयोजन केले आहे़ यासाठी शिवसेनेचे वरिष्ठ नेते, मंत्री, पदाधिकारी मोठे संख्येने पंढरपुरात दाखल होत आहेत़ पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महासभेचा तयारीचा आढावा घेतला व पत्रकारांशी संवाद साधला़
यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खा़ संजय राऊत, खा़ विनायक राऊत, खा. अनिल देसाई खा. अरविंद सावत, आ़ तानाजी सावंत, प्रा.शिवाजी सावंत, सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, महिला आघाडी संपर्कप्रमुख संजनाताई घाडी, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शैला गोडसे, रवी मुळे, महावीर देशमुख, विनोद कदम आदी उपस्थित होते.
पंढरपूरची महासभा ही राज्यातील रेकॉर्डब्रेक सभा होईल, असा विश्वास व्यक्त करीत रामदास कदम म्हणाले, राज्यातील व देशातील जनतेने मोठ्या विश्वासाने गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपाला सत्तेसाठी भरभरून कौल दिला, मात्र सत्ता आल्यानंतर भाजपाने राम मंदिर, कर्जमाफी, दुष्काळ, बेरोजगारी आदी महत्वाच्या मुद्यावर हिंदूत्वादी संघटनांसह शेतकºयांची घोर फसवणूक केली आहे़ आजपर्यंत त्यांनी धर्माच्या नावावर मते मागितली, मात्र राम मंदिर न उभारता स्वत:चा विकास केला़ भाजप सरकार राम मंदिर उभारत नाही हे लक्षात आल्यानंतर शिवसेनेने देशाच्या अस्मितेचा मुद्दा हाती घेत आयोद्येला जाऊन सर्व हिंदूत्वावादी संघटनांना एकत्रित करीत ‘पहिले मंदिर, फिर सरकार’ चा नारा दिला़ शिवसेनेच्या या घोषणेला देशभरातून पाठिंबा मिळाला आहे.
पंढरीतील महासभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे केवळ राममंदिराचा मु्द्यावर बोलणार असे काही जन बोलत आहेत, मात्र शिवसेना दुष्काळाच्या मुद्यावर मागे राहणार नाही़ आजपर्यंत शिवसेना बेरोजगारांच्या मागे ठामपणे उभे राहिली़ उद्धव ठाकरे यांच्या दबावामुळे सरकारला शेतकºयाची कर्जमाफी करावी लागली़ हे विसरून चालणार नाही़ पंढरीतील या सभेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असल्याचे त्यांनी सांगितले.
असा असेल उद्धव ठाकरे यांचा दौरा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दुपारी १ च्या दरम्यान पंढरपुरात दाखल होतील़ विश्रामगृहावर काही निवडक पदाधिकाºयांच्या चर्चेनंतर दुपारी ३ वाजता सभास्थळी येतील़ प्रारंभी या सभेत वारकºयांचे प्रतिनिधी म्हणून ह़ भ़ प़ जयवंत महाराज बोधले, ह़ भ़ प़ देवव्रत (राणा) महाराज वासकर हे मार्गदर्शन करतील़ त्यानंतर शिवसेनेचे काही पदाधिकारी बोलतील़ ठीक ५ वाजता स्वत: उद्धव ठाकरे बोलण्यासाठी उभे राहतील़ ६ वाजता सभा संपेल़ त्यानंतर ७ वाजता चंद्रभागा आरतीसाठी उद्धव ठाकरे हे चंद्रभागा नदीवरील इस्कान घाटावर पोहोचतील़ तेथे चंद्रभागेची आरती होईल़ तसेच शिवसेनेच्या वतीने चंद्रभागा नदीत हजारो दिवे सोडून चंद्रभागा प्रकाशमय करण्यात येईल़ उद्धव ठाकरे हे चंद्रभागेला नमस्कार करून राम मंदिर व्हावे, असा आशीर्वाद घेतील.