'कपबशीचं बटण दाबलं तरी भाजपालाच मतदान', आंबेडकर पिता-पुत्रांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 12:46 PM2019-04-18T12:46:11+5:302019-04-18T12:46:56+5:30
सोलापूर जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये सकाळपासूनच बिघाड झाल्याचे पाहायला मिळत आहे.
पुणे - प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी गंभीर आरोप केला आहे. वंचित बहुजन आघाडीसमोरली बटण दाबले तरी मतदान कमळालाच जात आहे, असे आरोप सुजात आंबेडकर यांनी केला आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा खळबळजनक दावा केला. मतदान यंत्रामध्ये घोळ करण्यात आला आहे. कप बशीचे बटण दाबले जात नाही आणि दाबले गेलेच तर मत कमळाला जात आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये सकाळपासूनच बिघाड झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर, अनेक ठिकाणी उशिरा मतदान सुरू झाल्याचेही वृत्त आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुजात आंबेडकर यांनी निवडणूक आयोगावर बोट दाखवत गंभीर आरोप केला आहे. सुजात म्हणाले की, विविध भागातले लोक मला फोन करत आहेत. वंचितला मतदान केले, तरी मत भाजपला जात आहे, असे ते मला सांगत आहेत. ग्रामीण भागासह शहरी भागात मिळून एकूण 35 ठिकाणी असे प्रकार घडल्याचे सुजात यांनी म्हटले. सुजात हे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव आहेत. प्रकाश आंबेडकर हे सोलापूर आणि अकोला मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यंदा वंचित बहुजन आघाडीने 39 मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत. यापैकी अनेक मतदारसंघात सुजात यांनीही उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या आहेत. तर, कपबशी हे चिन्ह वंचित बहुजन आघाडीला देण्यात आलं आहे.
सुजात पाठोपाठ प्रकाश आंबेडकर यांनीही मतदान यंत्रात घोळ असल्याचं म्हटलं आहे. मात्र, सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकाश आंबेडकर यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. तरीही, मतदान यंत्रात बिघाड, मतदान करण्यास वेळ वाढवून द्यावा, काँग्रेस ला मतदान केल्यास भाजपला मतदान होत असल्याबाबत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीहीी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.
आपलं मत वेगळ्याच पक्षाला गेलं असं वाटतंय?; फक्त २ रुपयांत करा चॅलेंज, पण.... #LokSabhaElections2019#VotingRightshttps://t.co/C5BFU4DNq6
— Lokmat (@MiLOKMAT) April 17, 2019