जमिनीचा रेट ठरविण्याचा अधिकार कलेक्टरांना; गडकरींनी स्पष्टच सांगितलं शेतकऱ्यांना
By Appasaheb.patil | Published: February 26, 2023 02:05 PM2023-02-26T14:05:36+5:302023-02-26T14:08:50+5:30
अक्कलकोट, दक्षिण तालुक्यातील शेतकरी यांनी घेतली गडकरींनी भेट
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : बहुचर्चित चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवेच्या निर्मितीसाठी अक्कलकोट तालुक्यातील सोळा गावांमधून हा रस्ता जाणार आहे. या तालुक्यात बहुतांश लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. शेती गेल्यानंतर आमच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यात कहर म्हणजे शासनाकडून एकरी अत्यल्प मोबदला जाहीर केल्याने आमच्यासमोर मरणाशिवाय पर्याय नाही. म्हणून समृद्धी महामार्गाप्रमाणे गुंठेवारी पद्धतीने आम्हाला भरघोस मोबदला द्या या मागणीसाठी अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.
या भेटीत गडकरी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बोलताना सांगितले की, तुमच्या शेतीचा रेट ठरविण्याचा अधिकार हा जिल्हाधिकारी यांचा आहे. आपल्या भागातील आमदारांना घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्या, तुमचा काय विषय आहे तो मांडा, त्यानंतर राज्य सरकारकडून तो माझ्याकडे आल्यानंतर मी निश्चित आपली मदत करेन असे गडकरींनी सांगितले. तुमच्या जमिनीचा रेट वाढविण्याचा अधिकार हा जिल्हाधिकाऱ्यांचा असल्याचेही गडकरी यांनी म्हटले.
पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, आम्ही कोणत्याही प्रोजेक्टसाठी तीन पट रक्कम देतो, त्यामुळे लोक आमच्याकडे आमच्या जमिनी घ्या यासाठी येतात. शेवटी शासनाचे पण काही नियम असतात, त्या नियमाला धरूनच नुकसान भरपाई दिली जाते असेही शेवटी उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी सांगितले. यावेळी सुरत चेन्नई महामार्गासाठी शेतकऱ्यांना उध्वस्त करणाऱ्या अत्यल्प मावेजाच्या नोटिसांची रविवारी सामुदायिक होळी करण्यात आली. या बैठकीचे आयोजक शेतकरी नेते स्वामीनाथ हरवाळकर यांनी समृद्धी मार्ग किंवा बाजारभावाच्या पाचपट दर जाहीर केल्याशिवाय शेतकऱ्यांनी शासनाच्या नोटिसा घेऊ नये व बलिदानास सज्ज राहावे असे आवाहन केले.