दोन घराण्यांनी जोडलं ‘किडनीचं नातं’, दोन कुटुंबांमध्ये अवयवांची अदलाबदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 10:53 AM2018-09-17T10:53:15+5:302018-09-17T10:54:50+5:30
‘अश्विनी’त १४ तास शस्त्रक्रिया; दोन कुटुंबांमध्ये अवयवांची अदलाबदल
नारायण चव्हाण
सोलापूर : परस्परांचे नातलग नसतानाही गरजेतून दोन कुटुंबे एकमेकांशी जोडली गेली . किडनी दानातून दोन जीव तर वाचलेच पण दोन कुटुंबांना आधार मिळाला. अवयवदानाच्या कुंभारी येथील अश्विनी ग्रामीण रुग्णालयात एकाच वेळी पार पडलेल्या चार शस्त्रक्रियांनी ही किमया घडली.
एका कुटुंबातील कर्ता मुलगा किडनीच्या आजाराने त्रस्त होता. साडेतीन वर्षांपासून तो डायलिसिसवर होता. डॉक्टरांनी किडनी बदलण्याचा सल्ला दिला. त्याची आई किडनी देण्यासाठी पुढे सरसावली, परंतु मुलाचा रक्तगट बी पॉझिटिव्ह तर आईचा ए पॉझिटिव्ह असल्याने तो जुळत नव्हता . मूत्ररोगतज्ज्ञ डॉ़ संदीप होळकर या रुग्णावर उपचार करीत होते . काही दिवसांनी अन्य राज्यातील एक जोडपे डॉ़ संदीप होळकर यांना भेटले . त्यातील कुटुंबकर्त्याला किडनीच्या आजाराने ग्रासले होते . पत्नी स्वत:ची किडनी देण्यास तयार होती, मात्र तिचा रक्तगट बी पॉझिटिव्ह होता अन् पतीचा ए पॉझिटिव्ह . रक्तगट जुळत नसल्याने दोन्ही कुटुंबे विवंचनेत होती . डॉ . होळकरांनी ही समस्या हेरून त्यांचे समुपदेशन केले. तब्बल चार महिने त्यासाठी वेळ दिला आणि विजोड असलेली रक्ताची नाती अखेर जुळली .
विशेष म्हणजे ही दोन्ही कुटुंबे दोन वेगवेगळ्या राज्यातून आलेली . परस्परांचा परिचय नाही तरी समस्या दोन्ही कुटुंबांची सारखीच . दोन महिलांनी दाखवलेल्या किडनी दानातून दोन्ही कुटुंबे सावरली . त्यांना आधार मिळाला . एकाच कुटुंबातील दोघांचे रक्तगट जुळले नाहीत, तरीही गरज आणि दोन महिलांच्या त्यागातून अनोळखी , भिन्न भाषी कुटुंबे त्याच रक्ताच्या नात्यांनी कायमची जोडली गेली . किडनी प्रत्यारोपण समन्वयक सागर देसाई यांची यात महत्वाची भूमिका राहिली .डॉ हेमंत देशपांडे , डॉ़ विठ्ठल कृष्णा , डॉ़ मयूर मस्तूद , डॉ़ रामचंद्र लहांडे , डॉ़ वैशाली येमूल , डॉ़ शोएब खान , डॉ़ सना मंगलगिरी , डॉ़ देडिया , डॉ़ आरती मडनोळे , डॉ़ गुणवंत नस्के , डॉ़ सिद्धेश्वर करजखेडे यांनी परिश्रम घेतले . अश्विनी ग्रामीण रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ़ माधवी रायते , संस्थेचे अध्यक्ष बिपीनभाई पटेल , भारतीबेन पटेल , मेहुल पटेल , उपअधिष्ठाता डॉ़ सचिन मुंबरे यांचेही मार्गदर्शन मोलाचे ठरले .
पहिले स्वॅप किडनी प्रत्यारोपण
कुंभारीतील अश्विनी ग्रामीण रुग्णालयात आतापर्यंत किडनी प्रत्यारोपणाच्या लाईव्ह आणि कॅडव्हेरिक शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत . मात्र एकाच वेळी परस्परांना किडनीदान केल्यानंतर तिचे प्रत्यारोपण करणारे स्वॅप प्रत्यारोपण पहिलेच आहे किंबहुना सोलापुरातील ही पहिलीच घटना आहे.
चार शस्त्रक्रिया, १४ तास
स्वॅप किडनी प्रत्यारोपण प्रक्रियेत किडनीदाता आणि तिचा लाभार्थी असे चार जण होते . एकाच वेळी या चारही जणांवर शस्त्रक्रिया कराव्या लागल्या . सकाळी ६ वाजता सुरू झालेल्या या चारही शस्त्रक्रिया सायंकाळी ८ वाजेपर्यंत चालल्या . तब्बल १४ तासांच्या अविश्रांत परिश्रमानंतर त्या यशस्वी झाल्या . डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला .