सोलापूर विद्यापीठ नामांतराच्या निर्णयाने धनगर समाज खूष तर लिंगायत समाज नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 02:05 PM2017-11-06T14:05:19+5:302017-11-06T14:07:17+5:30
सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्याने जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्टÑातील धनगर समाजबांधवांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.
शंकर जाधव
सोलापूर दि ६ : सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्याने जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्टÑातील धनगर समाजबांधवांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे समस्त लिंगायत समाज नाराज झाल्याने या समाजाच्या कोंडीत सरकार सापडले आहे. या दोन्ही समाजातील बहुतांश मतदार भाजपच्या मागे असल्याने ‘कहीं खुशी कहीं गम’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.
पूर्वी सोलापूर जिल्ह्यातील महाविद्यालये कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या कक्षेत होती़ दहावी, बारावीचे बोर्ड पुणे येथे तर महाविद्यालये कोल्हापूरकडे अशी सोलापूर जिल्ह्याची शैक्षणिक स्थिती होती. आजही दहावी, बारावीचे बोर्ड पुणे येथेच आहे. मात्र २००४ साली सुशीलकुमार शिंदे हे महाराष्टÑाचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील महाविद्यालयांची अडचण लक्षात घेऊन सोलापूरसाठी स्वतंत्र विद्यापीठाची निर्मिती करुन तशी घोषणा केली. केवळ एका जिल्ह्यापुरते स्वतंत्र विद्यापीठ म्हणून महाराष्टÑाच्या शैक्षणिक क्षेत्रात सोलापूरची ओळख निर्माण झाली.
सोलापूर विद्यापीठाची स्थापना ४ आॅगस्ट २००४ साली झाली. त्याचा उद्घाटन समारंभही सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते हुतात्मा स्मृती मंदिरात झाला. त्यानंतर अनेक अडचणींवर मात करुन पुणे रस्त्यावरील केगावजवळ सोलापूर विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्याला सुरुवात झाली. तेव्हापासूनच सोलापूर विद्यापीठाचा नामांतराचा प्रश्न गाजू लागला. सर्वप्रथम शिवा संघटनेने सोलापूर विद्यापीठाला महात्मा बसवेश्वर किंवा श्री सिध्देश्वर यांचे नाव देण्याची मागणी लावून धरली. कालांतराने जिल्ह्यातील धनगर समाजबांधवांनी विद्यापीठाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांचे नाव देण्यासाठी बाह्या सरसावल्या. अहिल्यादेवींचे विद्यापीठाला नाव देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, रिपाइं (आठवले गट) यांनी धनगर समाजबांधवांना पाठिंबा दिला. शिवसेनेने तर २०१३ साली राजमाता अहिल्यादेवी यांचे नाव असलेले बॅनरच विद्यापीठाच्या गेटला लावून नामांतराचे रणशिंग फुंकले.
२०१७ साल उजाडले आणि विद्यापीठाच्या नामांतराचा विषय गाजू लागला. प्रथम धनगर समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला आणि त्यानंतर लिंगायत समाजाची मोट बांधलेल्या ‘शिवा’ संघटनेनेही आपली ताकद पणाला लावून मोठा मोर्चा काढला. त्यामुळे शासनासमोर महात्मा बसवेश्वर, श्री सिध्देश्वर की राजमाता अहिल्यादेवी यांच्यापैकी कुणाचे नाव विद्यापीठाला द्यावे?, असा यक्ष प्रश्न निर्माण झाला. असे असले तरी विद्यापीठाच्या सिनेट समितीने सोलापूर विद्यापीठच नाव असावे, असा आग्रह धरला.
दरम्यानच्या काळात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यापीठाकडे एका नावाचा प्रस्ताव आला असल्याचे सांगून सर्वांचीच उत्सुकता वाढवली. एवढेच नाहीतर विद्यापीठाला श्री सिध्देश्वर, राजमाता अहिल्यादेवी होळकर किंवा जिजाऊ यांचे नाव पुढे येण्याची शक्यता असल्याचे सांगून त्या उत्सुकतेत भर घातली. आणि आज (रविवारी) दुपारी अचानक मुख्यमंत्र्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव विद्यापीठाला देण्याची घोषणा करुन धनगर समाजबांधवांना दिलासा दिला. यामुळे शहर आणि जिल्ह्यातील लिंगायत समाजबांधवांचा रोष मात्र शासनाने ओढवून घेतला.
------------------------
आजवरचे कुलगुरु
- डॉ. इरेश स्वामी - २००४ ते २००७
- डॉ. एन. एन. मालदार - २००७ (प्रभारी एक महिन्यासाठी)
- डॉ. बी. पी. बंडगर - २००७ ते २०१२
- डॉ. एन. जे. पवार - २०१२ (प्रभारी दोन महिन्यासाठी)
- डॉ. एन. एन. मालदार - २०१२ पासून