चड्डीवाल्यांचा सपोर्ट घेऊन मुख्यमंत्री झाला होता, हे विसरु नका; पवारांना मुख्यमंत्र्यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 04:48 PM2019-04-21T16:48:49+5:302019-04-21T16:51:09+5:30
भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस कुर्डुवाडी येथील आयोजित सभेत बोलत होते.
सोलापूर : पराभव समोर दिसत असल्यामुळेच शरद पवारांचा तोल सुटत चालला आहे. शरद पवार म्हणाले होते, भाजपामध्ये गेल्यात चड्या घालून मांड्या दाखवू नका. पण, इथे तर फुल पॅन्ट आहे. तुम्हीच या चड्डीवाल्यांच्या सपोर्टवर मुख्यमंत्री झाला होता, हे विसरू नका. कारण, येथे 23 तारखेला कोणाच्या चड्डी उतरतील ते समजणार आहे, असे टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.
भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस कुर्डुवाडी येथील आयोजित सभेत बोलत होते. "माढा मतदार संघात निवडणूक लढण्यासाठी पवार साहेब आले होते. पण ते गेले मी खेळणार नाही बारावा गडी म्हणून मॅच पाहणार आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली. ज्याला आम्ही बारावा खेळाडू म्हणूनही खेळण्यास तयार नव्हतो. त्याला मैदानात उतरवले. आता असली कोण? आणि नकली टीम कोण? हे येत्या 23 तारखेला समजेल. नकली टीमच्या भरोशावर मॅच जिंकू शकत नाही."
ही निवडणूक विकासाची व राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक आहे मजबूत देश आहे, हे सांगण्याची निवडणूक आहे असे सांगत पुलवामा हल्ल्याचा पुरावा मागणाऱ्या काँग्रेस सरकारवर त्यांनी खबरी टीका केली. भारत हा पाकिस्तानशी चर्चा करणार नाही तर नादी लागणाऱ्यांना ठोकणारा देश आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
याचबरोबर, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला. ते म्हणाले,'राहुल गांधी यांच्या पंजोबा, आई-वडील आणि आजी यांना सत्ता दिली. मात्र गरिबी हटवू शकले नाहीत. गेल्या पन्नास वर्षात त्यांनी भ्रष्टाचाराची मालिका दिली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र अवघ्या पाच वर्षात सामान्यांच्या जीवनात परिवर्तन करीत पारदर्शी प्रामाणिक शासन दिले व जगासमोर भारताला मजबूत देश बनवला.'