आईच्या दागिन्यातून वस्तीची तहान भागविण्याचा प्रयत्न, वडवळ येथील पवार बंधूंचे औदार्य, अस्थी खड्ड्यात पुरून वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 01:10 PM2018-03-05T13:10:40+5:302018-03-05T13:10:40+5:30
अनिष्ट रुढीप्रथेला दूर करत अनोखी तुकाराम बीज साजरी करणारे वडवळचे पवार बंधू व भगिनी. आईचे निधन झाल्यावर प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार केले.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
वडवळ दि ५ : अनिष्ट रुढीप्रथेला दूर करत अनोखी तुकाराम बीज साजरी करणारे वडवळचे पवार बंधू व भगिनी.
आईचे निधन झाल्यावर प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार केले. अस्थी नदीत किंवा पाण्यात न सोडता घरासमोर खड्डे घेऊन त्यात अस्थी विसर्जन करून वृक्षारोपण केले. आईच्या दागिन्यातून पाण्याची टाकी घेऊन वस्तीची तहान भागविण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा उपक्रम तिसºयाला तुकाराम बिजेनिमित्त करण्यात आला.
१ मार्च रोजी सुखदेव पवार यांच्या पत्नी विठाबाई यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार करताना दागिने काढून घेतले. सुरुवातीला लोक काय म्हणतील? हा प्रश्न निर्माण झाला; पण काही चांगल्या वृत्तीच्या ज्येष्ठांमुळे त्यांना सहकार्य मिळाले.
सर्व मुलांनी एक मणी सोडून इतर सर्व दागिने काढले. त्या दागिन्यांतून मिळणाºया रकमेतून वस्तीवर पाण्यासाठी टाकी बांधण्याचा संकल्प केला.
अनेक लोक अंगावर दागिने ठेवून मृत स्त्रीला अग्नी देतात. त्यामुळे ते दागिने राखेत राहतात. याचा काहीही उपयोग होत नसतो. काही ठिकाणी आईचे हे दागिने तिच्या पश्चात मुलींना द्यायची प्रथा असते; मात्र पवार बंधू व भगिनींनी आपल्या आईची स्मृती कायम राहावी, म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे नवनाथ, विनायक, हरिदास, किसन, गणेश या पाच बंधूंनी व भगिनी शांता आणि सीमा यांनी घेतला आहे.
पवार कुटुंबीय शेतकरी असून त्यांनी हा घेतलेला निर्णय पुरोगामी आहे. वडवळ येथे अशी ही विचारधारा रुजत आहे, याचे समाधान असल्याचे सखाराम मोरे, मनोज मोरे, महादेव ननवरे, तानाजी देशमुख यांनी सांगितले.
-----------------
दिवंगत आईची स्मृती कायम समोर राहावी व समाजोपयोगी कार्यातून तिला श्रद्धांजली वाहत तुकाराम बीज साजरी करावी. या उद्देशाने हा निर्णय आम्ही घेतला आहे.
-हरिदास पवार, वडवळ