हत्तुरेवस्ती दुहेरी खून खटल्यात दोघांना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 02:27 PM2018-03-09T14:27:43+5:302018-03-09T14:27:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : हत्तुरेवस्ती येथील श्रीदेवी विठ्ठल शेवगार व संगीता सिद्धलिंग कामाणे या मायलेकीचा खून केला तर श्रुती व सारिका या दोघींच्या डोक्यात मुसळ घालून त्यांच्या खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीस दोषी धरुन दोघांना जन्मठेप तर अन्य दोघांना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि सर्व आरोपींनी मिळून चार लाख रुपये नुकसानभरपाई अशी शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. सावंत - वाघोले यांनी सुनावली.
आरोपी सिद्धलिंग कामाणे यास मरेपर्यंत जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा, आरोेपी श्रीशैल बिराजदार यास खून प्रकरणी जन्मठेप व १० वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा,आरोपी पंडित कामाणे व मंगल कामाणे या दोघांना १ वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सर्व आरोपींनी मिळून जखमी श्रुती व सारिका यांना चार लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला.
३० मे २०१५ रोजी आरोपी सिद्धलिंग कामाणे याचा विवाह संगीता हिच्यासोबत झाला होता. लग्न झाल्यानंतर दोन महिने सासरच्या लोकांनी व्यवस्थित नांदवले. त्यानंतर आरोपी सिद्धलिंग कामाणे यास कायमस्वरुपी शिक्षकाची नोकरी मिळण्याकरिता पैशाची आवश्यकता असल्याने तो संगीता हिस आईकडून नोकरीसाठी वीस लाख रुपये घेऊन ये अशी मागणी करत होता. त्यावेळी संगीताने आई एवढे पैसे देऊ शकत नाही असे सांगत तुम्ही केलेली मागणी पूर्ण होऊ शकत नाही असे म्हणत होती. त्यावर सिद्धलिंग कामाणे, पंडित कामाणे, कैलास कामाणे व श्रीशैल बिराजदार या चौघांनी तुला स्वयंपाक चांगला येत नाही अशा किरकोळ कारणावरुन तिला त्रास देण्यास सुरुवात केली.
त्यामुळे संगीताची आई श्रीदेवी शेवगार हिस फोन करुन माहेरी घेऊन जाण्याची विनंती केल्याने ती माहेरी आली.
आरोपी सिद्धलिंग कामाणे हा रात्री फिर्यादीच्या घरी येऊन संगीताला म्हणाला की,आईला सांग शेत विकून पैसे दे असे म्हणून दमदाटी करुन मारहाण करुन निघून गेला. त्यानंतर २८ आॅगस्ट २०१५ रोजी आरोपी सिध्दलिंग हा हत्तुरेवस्ती येथे गेला आणि पत्नी व सासूस पैशाची मागणी केली असता, त्यानी पैसे न दिल्यामुळे त्याने रागाच्या भरात पत्नी व सासूच्या डोक्यात लाकडी मुसळ व दगडाने मारहाण करून खून केला. त्यानंतर श्रुती आणि सारिका या दोघीला मारहाण करुन त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. अशी फिर्याद श्रुती शेवगार हिने विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली. तत्कालीन पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, पोलीस उपायुक्त अपर्णा गीते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. जी अंकुशकर यांनी गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सरकार पक्षाचा युक्तिवाद
च्या खटल्यात सरकार पक्षातर्फे १० साक्षीदार तपासण्यात आले, यामध्ये जखमी श्रुती शेवगार व सारिका शेवगार,पंच साक्षीदार व डॉक्टराच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. आरोपी कैलास कामाणे हा गुन्हा घडल्यापासून फरार असल्याने त्याच्याविरुद्ध अटक केल्यानंतर खटला चालणार आहे. अॅड. संतोष न्हावकर यांनी आरोपीने लग्न केल्यापासून काही दिवसातच २० लाखांची मागणी केली. दोन महिन्यात फिर्यादीचे संपूर्ण कुटुंब संपविण्याचा प्रयत्न केला. आरोपी कोणत्याही दयेस पात्र नाहीत, त्यामुळे त्यास जास्तीत जास्त कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. संतोष न्हावकर तर आरोपीतर्फे अॅड. व्ही. डी. फताटे, अॅड. मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले.