आगामी निवडणुकीसाठी महाआघाडीची प्रक्रिया सुरू- सुशीलकुमार शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 10:50 AM2018-10-25T10:50:33+5:302018-10-25T11:07:11+5:30
सोलापूर : आगामी निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी महाआघाडी स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातील एका समितीमध्ये मी सहभागी आहे. ...
सोलापूर : आगामी निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी महाआघाडी स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातील एका समितीमध्ये मी सहभागी आहे. राजकीय अॅडजेस्टमेंट म्हणून मनसे आणि एमआयएमसारख्या भिन्न विचारसरणीच्या पक्षांनाही एकत्र आणायला पाहिजे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना सुशिलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकरांच्या आघाडीशी दोस्ताना करण्याच्या मुद्यावर भाष्य केले. आंबेडकर हे धर्मनिरपेक्ष आहेत. निवडणुका जिंकण्याचा त्यांचाही प्रयत्न आहे. शिवाय, त्यांना आमच्याबरोबर यायचे आहे आणि आमचीही त्यांना बरोबर घेण्याची भूमिका आहे, असे शिंदे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत विचारले असता ते म्हणाले की, उमेदवार ठरविण्याच्या प्रक्रियेवर राहुल गांधींचा प्रभाव असेल. माझ्या उमेदवारीचा निर्णयही पक्षश्रेष्ठीच घेतील; पण उमेदवार कोणीही असला तरी मी मात्र फिरतोय. निवडणुकीत फायदा आणि तोट्याचा विचार नसतो. समोर कोणताही उमेदवार असला तरी लढावेच लागेल, असेही एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सांगितले.
अनौपचारिक गप्पांमध्ये राष्टÑीय प्रश्नांकडे शिंदे यांचे लक्ष वेधले.
पावणेपाच वर्षांतील मोदी सरकारच्या काळाकडे एक नागरिक म्हणून आपण कसे पाहता, या प्रश्नावर ते भरभरून बोलले. स्मरणशक्तीला थोडेसे आवाहन करत, मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर केलेले विधान उद्धृत केले... त्यावेळी मी पत्रकारांना म्हणालो होतो, ‘वेट फॉर थ्रीर इयर्स, इट विल कोलॅप्स’ अगदी तसेच झाले. सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले. सर्व व्यवस्था कोसळू लागल्या. मोदींनी सत्तेवर येण्यापूर्वी अनेक आश्वासने दिली होती; पण ती कुठे पूर्ण झालीत? सारीच फसगत. जनता पार्टीच्या सरकारमध्ये जनसंघ सहभागी होता. तेव्हा त्या पक्षाने पायात पाय घालून सरकार पाडले. वाजपेयींच्या सत्ताकाळात शायनिंग इंडियाचा नारा दिला; पण देशाची तशी स्थिती नव्हतीच. त्यामुळे मोदी सरकारचीही वाटचाल तशीच राहणार, हे ओळखूनच मी सरकार ‘कोलॅप्स’ होईल, असे म्हणालो होतो, शिंदे सांगत होते.