किडनी दानातून तिने दिला मुलाला पुनर्जन्मत्र, सोलापूरातील घटना, यशस्वी प्रत्यारोपन शस्त्रक्रिया
By admin | Published: March 25, 2017 10:38 AM2017-03-25T10:38:44+5:302017-03-25T10:38:44+5:30
किडनी दानातून तिने दिला मुलाला पुनर्जन्मत्र, सोलापूरातील घटना, यशस्वी प्रत्यारोपन शस्त्रक्रिया
किडनी दानातून तिने दिला मुलाला पुनर्जन्मत्र, सोलापूरातील घटना, यशस्वी प्रत्यारोपन शस्त्रक्रिया
सोलापूर : आईसाठी मूल हे सर्वस्व असते़ त्याच्या भल्यासाठी कोणतेही दिव्य करण्याची आईची तयारी असते़ अशाच एका आईने स्वत:ची किडनी देऊन आपल्या तरुण मुलास पुनर्जन्म दिला आहे़
चपळगाववाडी (ता़ अक्कलकोट) येथील अक्षय गोविंदे (वय २२) हा डिप्लोमाधारक तरुण दोन वर्षांपासून किडनीच्या विकाराने त्रस्त होता़ सतत डायलिसीसचा उपचारही त्याच्यासाठी निकामी ठरत होता़ अशावेळी किडनी प्रत्यारोपणाशिवाय अन्य पर्याय नसल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला़ ४ थी पर्यंत शिक्षण घेतलेल्या महानंदा गोविंदे (वय ५१) अक्षयची आई किडनी देण्यासाठी पुढे सरसावली़ आपल्या मुलाला स्वत:ची किडनी देऊन त्याला पुनर्जन्म देण्याचा आनंदही या मातेने याची डोळा अनुभवला़ सोलापूरच्या यशोधरा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली़
अक्षयच्या आजाराने गोविंदे कुटुंब अस्वस्थ होते़ वडील शिवशरण गोविंदे प्राथमिक शिक्षक आहेत़ वडील, मोठा भाऊ अविनाश, आई महानंदा या तिघांनी अक्षयला किडनी देण्याची तयारी दर्शविली होती; मात्र वडील मधुमेही रुग्ण, भावाचे नुकतेच लग्न झालेले त्यामुळे आईने स्वत:ची किडनी देण्याचा आग्रह धरला़ गुरुवारी यशोधरा हॉस्पिटलमध्ये आई महानंदा हिची किडनी काढण्यात आली़ त्यानंतर काही वेळातच अक्षयवर प्रत्यारोपण करण्यात आले़ २४ तासात दोघांची प्रकृती पूर्ववत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले़
या किडनी प्रत्यारोपण मोहिमेत डॉ़ बसवराज कोल्लूर, डॉ़ हेमंत देशपांडे, डॉ़ विठ्ठल कृष्णा, डॉ़ विजय शिवपुजे, डॉ़ पीयूष किमीतकर, डॉ़ सुरेश कट्टीमनी, डॉ़ राहुल स्वामी, डॉ़ मंजिरी देशपांडे, डॉ़ प्रणिता, प्रशासकीय अधिकारी इ विजय चंद्रा आदींनी सहभाग घेतला होता़
--------------------
सोलापुरात गरजू रुग्णांना कमी खर्चात डायलिसीस, प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आदी उपचार करण्याचा आमचा प्रयत्न आहे़ अक्षय गोविंदेच्या कुटुंबीयांनी अवयवदान चळवळीस बळकटी देण्याचा प्रयत्न केला आहे़ ही चळवळ अनेकांना जीवनदान मिळवून देते़
- डॉ़ बसवराज कोल्लूर, किडनी तज्ज्ञ, यशोधरा हॉस्पिटल, सोलापूऱ
----------------------
अक्षयला होणारा त्रास पाहवत नव्हता़ त्याला किडनी देण्याचा निर्णय मी घेतला़ माझ्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत अभिमानास्पद आहे़ त्याला नवजीवन मिळाल्याने माझेही जीवन सार्थकी लागले़
-महानंदा गोविंदे, किडनीदाता (अक्षयची आई)