माढा शरद पवारांना पाडा.. ही पोस्ट संजयमामांचीच !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 02:09 PM2019-05-25T14:09:12+5:302019-05-25T16:37:55+5:30
खासदार रणजितसिंंह नाईक-निंबाळकरांचा गौप्यस्फोट: आता खुर्च्या खाली करणार
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या अगोदर ‘माढा शरद पवारांना पाडा’ अशी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करणारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांचाही समावेश होता, असा गौप्यस्फोट भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केला.
लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघातून आघाडी घेतल्याचे समजताच रणजिसिंह नाईक सोलापुरात आले. भाजप कार्यकर्त्यांसह जल्लोष करून ते रामवाडी गोदाम येथील मतमोजणी केंद्राला भेट देण्यासाठी आले.
मीडिया कक्षात संवाद साधताना त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीअगोदर व्हायरल झालेल्या त्या पोस्टचा उल्लेख केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे माढा मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. त्यामुळे कार्यकर्त्यांशी संवाद साधून भूमिका ठरविण्यासाठी ते माढ्याच्या दौºयावर येण्याआधी सोशल मीडियावर ‘माढा शरद पवार यांना पाडा’ अशी पोस्ट व्हायरल करण्यात आली. या पोस्टचा धसका घेऊन पवार यांनी माघार घेतली. पण ही पोस्ट व्हायरल करणारांमध्ये संजय शिंदे हे सामील होते, असा आरोप नाईक यांनी केला. ही पोस्ट तयार करताना शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली होती.
आता लोकसभा निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी संजय शिंदे यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदावरुन हटविण्यात येईल. मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. शिंदे यांची झेडपीची तर विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांची खुर्ची रिकामी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा नाईक-निंबाळकर यांनी यावेळी दिला. यावेळी त्यांच्यासमवेत धैर्यशील मोहिते-पाटील आदी उपस्थित होते.