'मोदींनी शाळा सोडल्याचा दाखला दाखवावा', प्रकाश आंबेडकरांचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 12:11 PM2019-04-19T12:11:58+5:302019-04-19T12:12:41+5:30
प्रकाश आंबडेकर यांनी माढा येथील वंबआचे उमेदवार विजय मोरे यांच्या प्रचारार्थ अकलूज येथे आयोजित सभेत आंबेडकर यांनी मोदींवर प्रहार केला.
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागासवर्गीयांना काय दिलं?. मोदी हे 15 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते, तर 5 वर्षे देशाचे पंतप्रधान होते. मात्र, मागासवर्गींयांना काय मिळाल? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे. तसेच मोदींना शाळा सोडल्याचा दाखला प्रसिद्ध करावा, असे आवाहनही आंबेडकर यांनी केले आहे. मोदींनी माढ्यातील सभेत ओबीसी असल्याचं म्हटलं होतं, त्यावरुन प्रकाश आंबेडकरांनी दाखल दाखविण्याचं चॅलेंज दिलं आहे.
प्रकाश आंबडेकर यांनी माढा येथील वंबआचे उमेदवार विजय मोरे यांच्या प्रचारार्थ अकलूज येथे आयोजित सभेत आंबेडकर यांनी मोदींवर प्रहार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माढ्यातील सभेत बोलताना, मी मागासवर्गीय असल्यामुळेच काँग्रेसने मला जातीवाचक शिव्या दिल्याचं मोदींनी म्हटलं होतं. पण, आता काँग्रेस मागासवर्गीयांना चोर म्हणत असून मी ते सहन करणार नाही, असे म्हणत माढ्यातील सभेत मोदींनी ओबीसी कार्ड वापरले होते. तसेच, येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला होता.
दरम्यान, माढा लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी आणि भाजपाने प्रतिष्ठेची केली आहे. या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतली, तर मुख्यमंत्रीही दौरे करत आहेत. तसेच, राष्ट्रवादीच्या शरद पवारांनीही येथे एका दिवसात तीन सभा घेण्याचं नियोजन केलंय. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या लढाईत आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचाही उमेदवार प्रतिष्ठेचा बनला आहे. त्यामुळेच, प्रकाश आंबेडकर यांनीही या मतदारसंघात लक्ष घातले आहे.