देशाचा शत्रू पाकिस्तान की शेतकरी? खासदार राजू शेट्टी यांचा भांबुडी येथील शेतकरी मेळाव्यात सवाल, भाजप सरकारवर जोरदार टिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 02:24 PM2018-02-28T14:24:30+5:302018-02-28T14:24:30+5:30
जिल्ह्यातील उसाला भाव कमी का? ऊस तुटल्यानंतर १४ दिवसात रक्कम दिली पाहिजे. नाही दिली तर १५ टक्के व्याज द्यावे, तो देण्याचा कायदा आहे. मग कारखान्याची मालमत्ता जप्त करून शेतकºयांचे पैसे दिले पाहिजेत.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
माळशिरस दि २८ : जिल्ह्यातील उसाला भाव कमी का? ऊस तुटल्यानंतर १४ दिवसात रक्कम दिली पाहिजे. नाही दिली तर १५ टक्के व्याज द्यावे, तो देण्याचा कायदा आहे. मग कारखान्याची मालमत्ता जप्त करून शेतकºयांचे पैसे दिले पाहिजेत. कमी रिकव्हरीच्या नावाखाली किती दिवस लूट करणार?, साखरेचे दर पडले म्हणून आम्ही दर कमी घेणार नाही. २०१३ च्या कायद्यानुसार जोपर्यंत शेतकरी संमती देत नाही तोपर्यंत रस्ता करता येत नाही. विकास हवा पण शेतकºयांची थडगी बांधून विकास नको आहे. या सरकारने पाकिस्तानातून माल आयात केला. नेमका या सरकारचा शत्रू कोण पाकिस्तान की शेतकरी? असा सवाल खा. राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.
भांबुर्डी (ता. माळशिरस) येथील काकासाहेब मोटे यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी काकासाहेब मोटे, अमर कदम, अमोल हिप्परगे, जयंत बगाडे, अनिल पवार, सुरेश मोटे, भीमराव फुले, राहुल बिडवे, किरण साठे, सरपंच केशव वाघमोडे, देविदास वाघमोडे, आप्पासाहेब कर्चे, प्रेमानंद नरुटे, अॅड. संजय माने, मदनसिंह जाधव, बापू गायकवाड, शिवाजी पाटील, राजाभाऊ वाघमोडे आदी उपस्थित होते.
माळशिरस तालुका एकेकाळी स्वाभिमानी संघटनेचा बालेकिल्ला होता. अनेक वर्षांनंतर खा. शेट्टीचा दौरा झाला. ते म्हणाले, काहीही झाले तरी घामाचा दाम मिळायलाच पाहिजे. स्वामीनाथन आयोगासाठी टाळाटाळ केली जाते. शेतकºयांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढत जातोय. शासनाने जाहीर केलेला हमीभावसुद्धा दिला नाही.
शेतकºयांच्या नुकसानीची एका वर्षाची तफावत ६.५० लाख कोटी आहे. अशा सरकारचे उदो उदो करणाºयाला तुडवायलाच पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी रवींद्र मोटे, दादासाहेब वाघमोडे, रामभाऊ कचरे, खंडू कळसुले, महादेव वाघमोडे आदी उपस्थित होते.
--------------------
शेतकरी संघटनेची पहिली एन्ट्री
अंतर्गत राजकीय घडामोडीनंतर पहिल्यांदाच शेतकरी संघटनेचा छोटेखानी शेतकरी मेळावा घेण्यात आला. यासाठी मात्र शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचे आयोजन माजी जि. प. सदस्य काकासाहेब मोटे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. यावेळी राजकारणात पदार्पण केलेल्या काकांचा उल्लेख जखमी वाघ असा खा. शेट्टी यांनी केला. यावेळी सदाभाऊ खोत यांच्या गाडीची तोडफोड करणारे बापू गायकवाड यांचा सत्कार खा. राजू शेट्टी यांनी केला.
------------------
इतरांची फटकेबाजी
- यावेळी आप्पासाहेब कर्चे यांनी अनेक विषयांना हात घालत नेत्यांवर टीकेची झोड उठवली. जयंत बगाडे यांनी संघटनेच्या कामाचे चित्र उभा करत पक्षाच्या पुढाकाराने शेतकºयांच्या प्रश्नाला वाचा फुटली असून यापुढे समज-गैरसमज बाजूला ठेवून काम करावे. आपल्या डोक्यावरील कर्जाची नैतिक जबाबदारी आहे. यावेळी काकासाहेब मोटे यांनी शंकर सहकारी, चांदापुरी कारखाना, विजय शुगर व सातारा, लातूर, पुणे, पंढरपूर या राष्ट्रीय महामार्ग बाधित शेतकºयांना आपल्या पुढाकाराने न्याय मिळवून देण्याचे आवाहन केले.